मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर (Mayor) निवडीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा अनपेक्षित पद्धतीने महिलाराज येणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे (Shivsena) पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातील लाडक्या बहिणींवर जबाबदारी देत इथे विश्वास दाखवला आहे. ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगर येथे अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे, सत्ता स्थापनेतही लाडक्या बहिणींना प्राधान्य देत एकनाथ शिंदेंनी महिलांचे हात बळकट केले आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांतून लाडक्या बहिणींनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, महापौरपद देताना लाडक्या बहिणींनाच प्राधान्य द्यावे अशी आग्रही भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर आता महिलाराज दिसणार आहे. महिलांसाठीपद आरक्षित नसताना त्यांना हे पद मिळण्याची ही या पालिकांच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार हे निकालातून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच निकालानंतर शिवसेना कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. या तिन्ही ठिकाणची महापौरपदे महिलांसाठी आरक्षित झालेली नव्हती. त्यामुळे पुरूषांनाच तिथे संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, ती चुकीची ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तीनही महापालिकांची जबाबदारी आपल्या पक्षाच्या लाडक्या बहिणी असलेल्या महिला नगरसेवकांकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे महापालिकांमध्ये महिला आरक्षण नसतानाही जाणीवपूर्वक हा निर्णय घेत महिलांना संधी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आजवर लाडक्या बहिणींच्या सबलीकरणाला प्राधान्य दिलेआहे. त्यामुळेच महिलांना संधी ही आरक्षणाची वाट न पाहता कुवतीनुसार मिळावी हा विचार करून तीनही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबईतही शिवसेनेच्या महिलांचा वरचष्मा
मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या 29 पैकी 19 महिला नगरसेविका आहेत. मुंबईतील युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला 90 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 63 जागी शिवसेनेने महिला उमेदवार दिल्या होत्या हे विशेष.
नगराध्यक्ष पदांवरही महिलांचाच वरचष्मा
नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 60 नगराध्यक्ष निवडून आले. त्यापैकी 33 महिला आहेत, त्यामुळे शिवसेनेत नगरपालिकांमध्येही लाडक्या बहिणींचे राज्य कायम राहणार आहे.