Mahim Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल प्रभादेवीमध्ये सभा झाली. यावेळी राज ठाकरेंसह अमित ठाकरेंचं देखील भाषण झालं.
सदर सभेत अमित ठाकरे म्हणाले की, आधी सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर आमच्या काकांना वाईट वाटले म्हणून माहीममध्ये दुसरी उमेदवारी जाहीर झाली.परंतु उमेदवार कितीही असले, तरी मला फरक पडत नाही, असं अमित ठाकरेंनी सांगितले. अमित ठाकरेंच्या या विधानावर आता ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी निशाणा साधला आहे. एबीपी माझाशी बोलताना महेश सावंत यांनी राज ठाकरेंसह अमित ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
अमित ठाकरे बालिश, काहीही बोलू शकतात- महेश सावंत
अमित ठाकरेंना राजकारण कळतं का?, ते बालिश आहे, काहीही बोलू शकतात, अशी टीका महेश सावंत यांनी केली. तसेच अमित ठाकरेंना भेटण्यासाठी कधीही अपॉईंटमेंट घेण्याची गरज लागणार नाही. तो कधीही भेटू शकतो, असं राज ठाकरे कालच्या जाहीर सभेत म्हणाले होते. यावर देखील महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरेंना वक्तव्य करायला स्वतंत्र आहे. जनता सुज्ञ आहे जनता ठरवेल, असंही महेश सावंत यांनी सांगितले. जनतेला कोण कधीही भेटू शकतो, हे माहीती आहे. आमची सभा बघा आणि त्यांची सभा बघा...यावरुन भाडोत्री माणसं कुठली आणि स्थानिक माणसं कुठली हे लोकांकडे बघूनच दिसेल, अशी टीकाही महेश सावंत यांनी केली. तसेच राज ठाकरेंना बोलण्याइतका मी मोठा नाहीय, असंही महेश सावंत यांनी सांगितले.
सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो- राज ठाकरे
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहणार...माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. पण जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार, असं राज ठाकरे यांनी सांगितले. नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित ठाकरे बोलला की सर्व नेत्यांनी उभं राहीलं पाहिजे, मी पण उभा राहील. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं तु निवडणुकीसाठी उभा राहणार आहेस? अमित बोलला तुम्ही सांगाल तर राहील. आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.