ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. भाजपने कल्याण डोंबवलीतून (KDMC) विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना (Shivsena) युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध करत महायुतीने मोठी आघाडी घेतली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. येथे, भाजपचे (BJP) 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर, राज्यात भाजपचे 8 आणि शिवसेना शिंदे गटाचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुतीने मतदानापूर्वीच घोडदौड सुरु केली आहे. कारण, भाजपचे 5 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे 122 सदस्यसंख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. मतदानापूर्वीच महायुतीने सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. आधी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरल्याचं दिसून आलं. मात्र, आता शिवसेनेचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली आहे.
भाजपची घोडदौड
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर,मंदा पाटील यांच्यापाठोपाठ ज्योती पवन पाटील या 24 ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या भाजप उमेदवारांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे.
शिवसेनेचाही डंका, 4 बिनविरोध
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका पाहायला मिळाला. कारण, शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची खेळी यशस्वी ठरली. पॅनेल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्रमांक 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार राजेश मोरे यांचे ते चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
भिवंडी महापालिकेत भाजप उमेदवार बिनविरोध
भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विजयाचे खाते उघडले आहे.प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. मान सरोवर येथील निवासस्थानी विजय जल्लोष साजरा करीत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे अभिनंदन करीत हा विजय भिवंडीतील विजयाची नांदी ठरेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.विशेष म्हणजे २४ वर्षांच्या दरम्यान झालेल्या चार निवडणुकीत कोणीही बिनविरोध विजयी झाला नव्हता तो विक्रम भाजपाचे सुमित पाटील यांनी पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत केला आहे.
महायुतीच्या 13 जागा बिनविरोध, भाजपच्या सर्वाधिक
दरम्यान, महायुतीच्या या 9 जागांसह राज्यातील आणखी काही महापालिकेत विजयाचा झेंडा फडकला आहे. त्यामध्ये, भाजपने केडीएमसीत 5, धुळे महापालिकेत 2, पनवेल 1 आणि भिवंडी महापालिकेत 1 जागा बिनविरोध करत, राज्यात 9 जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी केले आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत 4, जळगावात एक जागा बिनविरोध केल्याने, राज्यात 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तसेच, अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्टवादीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे, राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 15 जागा बिनविरोध झाल्या आहेत.