मुंबई: गेल्या टर्ममध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाच्या अनेक आमदारांना मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे आता विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून शिंदे गटाचे (Shivsena Shinde Camp) अनेक बडे आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. अद्याप महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधीचा (Mahayuti Government Oath Taking Ceremony) मुहूर्त ठरलेला नाही. मात्र, त्याआधीच शिंदे गटाच्या बड्या आमदारांनी मुंबईत तळ ठोकत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.
यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा मंत्रिपद मिळावे यासाठी माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ज्यांच्याकडे मंत्रिपदे होती, ते आमदार आपापली खाती पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप हा महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रीपदं येण्याची शक्यता असून शिवसनेच्या वाट्याला कमी मंत्रीपद येऊ शकतात, असा अंदाज आहे.
मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता शिंदे गटाचे बहुतांश आमदार पहिल्याच खेपेत मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी ताकद लावत आहेत. कारण गेल्या टर्ममध्ये शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी हमखास संधी मिळेल, अशी चर्चा असणाऱ्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना शेवटपर्यंत वंचित राहावे लागले होते. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, या आशेने या दोन्ही आमदारांनी शेवटपर्यंत मंत्रिपदाची वाट पाहिले होती. मात्र, या दोघांना मंत्रीपद मिळाल नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते विरोधकांच्या खिल्लीचा विषय ठरले होते. अखेर विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी तर भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांची बोळवण करण्यात आली होती.
भरत गोगावलेंना आतातरी कोट घालायला मिळणार का?
महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळात महाडचे आमदार भरत गोगावले यांना संधी मिळेल, अशी खात्री अनेकांना होती. भरत गोगावले यांनीही शपथविधीसाठी खास कोट शिवून ठेवला होता, असे सांगितले जाते. मात्र, मंत्रीपद न मिळाल्यामुळे भरत गोगावले यांना या कोटाची घडी मोडण्याची संधी कधीच मिळालीच नव्हती. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये तरी भरत गोगावले यांना शपथविधीसाठी शिवून घेतलेल्या कोटाची घडी मोडण्याची संधी मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा