Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर महायुतीमध्ये बैठकांवर बैठकांचा सिलसिला झाल्यानंतरही दोन जागांवर अजूनही तिढा कायम आहे. कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षच मोठा भाऊ राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल. राष्ट्रवादी काँग्रेसची 15 जागांवर बोळवण होण्याची शक्यता आहे. दरम्यान समोर आलेल्या फॉर्म्युलानुसार 81 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 37 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना 30 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 14 जागांवर निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे.
भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप
काल दिवसभर बैठकींचा सिलसिला होऊनही फॉर्मुल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज (29 डिसेंबर) पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर जवळपास फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. आज संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे सुद्धा वाटप केलं जात आहे. भाजपकडून 29 जणांना फॉर्म वाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून आमदार राजेश क्षीरसागर, भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिन्ही पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तिन्ही पक्षांच्या ताकदीचा अंदाज घेऊन प्रभागनिहाय उमेदवारांवर चर्चा करण्यात आली.
काँग्रेसकडून 61 उमेदवार घोषित
दुसरीकडे, कोल्हापुरात काँग्रेसकडून दोन याद्यांमद्ये 61 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांना काँग्रेसकडून पुरस्कृत करण्यात आलं आहे. आज काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांगलीत तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढवणार
दरम्यान, कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार असले तरी सांगलीत मात्र तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये युती होऊ शकली नाही. दुसरीकडे, सांगलीमध्ये महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे. आज सर्वच पक्षातील बहुतांश इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले असले, तरी एबी फॉर्म मात्र पक्षांकडून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी टाळण्यासाठी उद्याच पक्षाकडून एबी फॉर्म निवडणूक कार्यालयामध्ये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे बंडखोरीचा आणि अंतर्गत गटबाजीची धास्ती घेतल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या