Ajit Pawar On Manoj Jarange Patil: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आज शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. 


गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यातच आता मराठा नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या बॉण्डवर जो लिहून देईल, त्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. 


प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार- अजित पवार


मनोज जरांगे यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना उमेदवार उतरवू देत...प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्यांनाही तो अधिकार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच अजित पवार यांना एबी फॉर्मबद्दल विचारले असता, ज्यांच्या उमेदवारी ठरल्या होत्या. ज्यांना अर्ज भरायचे होते, त्यांना यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म दिले आहेत, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर अजित पवारांना विचारले असता, ज्या जागांवर शिवसेना आणि भाजपच्या लोकांची चर्चा होणार आहे, तिथे मी असल्याचं कारण काय?, असं अजित पवारांनी सांगितले. 


भाजपकडून मराठवाड्यात 10 मराठा उमेदवार-


मराठवाड्यात जरांगे पाटील यांचा फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने मराठवाड्यातून सर्वाधिक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मराठवाड्यात भाजपने पहिल्याच यादीत 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात तीन मतदारसंघ राखीव आहेत, 13 खुल्या मतदारसंघातुन मराठवाड्यात दहा मराठा समाजाचे उमेदवार भाजपने दिले आहेत. तर, औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अतुल सावे आणि तुषार राठोड हे दोन ओबीसी चेहरे दिले आहे. तसेच, प्रशांत बंब यांच्यारुपाने जैन समाजाच्या चेहरा गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीत उतरवला आहे.


संबंधित बातमी:


Worli vidhan sabha: वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मेगाप्लॅनिंग, भाजपचा बडा नेता किंवा शिंदे कुटुंबातील व्यक्ती रिंगणात?