Baramati | भाजपच्या वल्गना फोल, सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2019 02:53 PM (IST)
जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला. भाजप उमेदवार कांचन कुल यांचा सुळेंनी पराभव केला
मुंबई : 'बारामती' जिंकण्याच्या भाजपच्या वल्गना अखेर फोल ठरल्या आहेत. बारामतीचा गड राखण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना पराभवाचा सामना करावा लागला. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या किती मतांच्या फरकाने हरतील, हेच पाहायचं आहे, असं पाटील म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बारामतीची जागा जिंकण्याचा प्रबळ विश्वास व्यक्त केला होता. मात्र जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला. या मतदारसंघात 10 अपक्ष उमेदवारांसह एकूण 18 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. बारामतीची निवडणूक देशातील प्रमुख लढतींपैकी एक समजली जात होती. बारामती पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार सलग पाच वेळा बारामतीतून खासदार होते.