Sunil Keadr : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच नागपूरमध्ये (Nagpur) देखील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह समोर आला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनील केदार (Sunil Keadr) यांनी नागपूरमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात बंडखोर उमेदवारांचे समर्थन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत नागपूरमधील काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे सुनील केदार यांची तक्रार केली आहे. भूपेश बघेल यांना भेटून सुनील केदार यांना समज देण्याची मागणी केली आहे.  


कोणी कोणत्या मतदारसंघात केली बंडखोरी?


सुनिल केदार समर्थकांनी नागपूर जिल्ह्यातील चार मतदारसंघात बंडाचा झेंडा फडकवला आहे. रामटेकमधून माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र मुळक हे सुनील केदार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. राजेंद्र मुळक यांचा उमेदवारी अर्ज भारताना स्वतः सुनील केदार व रामटेकचे खासदार श्यामसुंदर बर्वे आणि रश्मी बर्वे उपस्थित होते. येथे महाविकास आघाडीकडून उबाठा चे उमेदवार विशाल बरबटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर उमरेड विधानसभा मतदार संघात सुनील केदार समर्थक व जिल्हा परिषद चे सभापती कैलास चूटे यांनी अर्ज भरला आहे. इथं महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे संजय मेश्राम उमेदवार आहे. हिंगणा विधानसभा मतदार संघात सुनील केदार समर्थक माजी जिल्हा परिषद सभापती उज्वला बोढारे यांनी बंडखोरी केली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे रमेश बंग यांनी अर्ज भरला आहे. तर पश्चिम नागपुर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नरेंद्र जिचकार हे सुनील केदार यांचे समर्थक आहेत.


आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक, बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न : पटोले 


दरम्यान, याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मतदार संघात दोन उमेदवार व बंडखोरीच्या मुद्यावरुन आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती पटोले यांनी दिली. बंडखोरांना शांत करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले. चर्चेतून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुनील केदारांनी बंडखोर उभे केले आहेत, त्याची तक्रार झाली आहे. भूपेश बघेल आपला अहवाल पाठवणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.