Vidhansabha Election News Sharad Pawar NCP Candidate List 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. यामध्ये माढा, पंढरपूर आणि मोहोळ या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात शरद पवार यांचा नेमका प्लॅन काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.


माढा, पंढरपूर आणि मोहोळ या मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची असा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधापासूनच इच्छुकांनी गाठी भेटी सुरु केल्या होत्या. तसेच मतदारसंघात दौरेही सुरु केले होते. तसेच अनेकांना वरिष्ठांकडे उमेदवारी देण्याची मागमी देखील केली होती. त्यामुळं अनेक ठिकाणी पक्षाच्या नेत्यांपुढे तिकीट कोणाला द्यावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज पक्षश्रेष्ठी या तीन म्हणजे माढा, पंढरपूर आणि मोहोळ या मतदारसंघाबाबत निर्णय घेतील अशी शक्यता होती. मात्र, अद्यापही या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय झालेला नाही. आज रात्री उशीरा किंवा उद्या सकाळपर्यंत या तिनही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाछी घोषणा होण्याची शक्यता आहे.


कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक?


माढा विधानसभा मतदारसंघ कोण कोण इच्छुक?


माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत . यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, तसेच अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, अॅड. मिनल साठे यांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार उमेदवारीचा माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


पंढरपूरमधून भरीरथ भालके की प्रशांत परिचारक?



पंढरपूर-मंगळवेढा मतदारंसघातून देखील अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडून प्रशांत परिचारक यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळं शरद पवार नेमकी उमेदवारी कोणाला देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


मोहोळ मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक


मोहोळ विधानसभा मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक आहे. यामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजीत ढोबळे, संजय क्षीरसागर, तसेच रमेश कदम हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं पवार कोणाला तिकीट देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.