Former MLA Madhukar Kukde joins BJP : निवडणूक प्रचाराचा शेवटच्या दिवसापूर्वीच शरद पवारांना (Sharad Pawar) भंडाऱ्यात मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे अगदी निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधुकर कुकडे (Madhukar Kukde) यांनी भाजपात प्रवेश (Join BJP) केला आहे. मधुकर कुकडे हे तुमसर विधानसभेतून तीन वेळेस आमदार राहिले आहेत. तसेच पोटनिवडणुकीत एकदा खासदारसुद्धा झाले होते.
मधुकर कुकडे यांचा प्रवेश म्हणजे भाजपात घरवापसी
नागपूर येथील काटोलमध्ये झालेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत मधुकर कुकडे यांनी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मधुकर कुकडे यांचा हा प्रवेश म्हणजे भाजपात घरवापसी आहे. यापूर्वी मधुकर कुकडे हे भाजपाचे तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत. महाविकास आघाडीच्यावतीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एनवेळी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी घोषित केली होती. तेव्हापासून मधुकर कुकडे हे पक्षांच्या नेत्यांवर नाराज होते. विशेषत: मधुकर कुकडे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या मताधिक्यात वाढ होईल.
कोण आहेत मधुकर कुकडे ?
मधुकर कुकडे हे तीन वेळेस भाजपाचे आमदार राहिलेले आहेत
1995 ते 1999 भाजपाचे आमदार
1999 ते 2004 भाजपचे आमदार
2004 ते 2009 भाजपचे आमदार
2009 मध्ये मधुकर कुकडे यांचा काँग्रेसचे अनिल बावनकर यांनी पराभव केला होता.
मधुकर कुकडे यांनी 2014 भाजपाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
नाना पटोले यांनी भाजपाचा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर 2018 ते 2019 या दरम्यान पोटनिवडणुकीत ते निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले मधुकर कुकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कुणबी समाजाचा प्राबल्य असून कुकडे यांची कुणबी समाजाचा मोठ्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, मधुकर कुकुडे हे पहिले भाजपचेच कार्यकर्ते होते. ती वेळा ते भाजपकडून विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत ते विजयी देखील झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवार गटासोबत गेले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा शरद पवरा गटात दाखल झाले होते. अशातच आता त्यांनी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.