Maharashtra Vidhansabha Election 2024 : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दोन्ही खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील (Pandharpur Mangalvedha Assembly) राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी माचनूर येथील महादेव मंदिरात दर्शन घेत केला प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विराट सभेची सुरुवात झाली. तर दुसरीकडे कालच संध्याकाळी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Darishsheel Mohite Patil) यांच्या हस्ते याच ठिकाणी झाला होता.
काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव न घेता गद्दाराला जनता धडा शिकवेल असा टोला लगावला होता. यावर आज प्रणिती शिंदे आणि भगीरथ भालके काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवेढा तालुक्यातील अतिशय पुरातन असणाऱ्या माचनूर येथील महादेव मंदिरात सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडल्याने माचनुर चा महादेव कोणाला पावणार याचीही चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रचाराचा शुभारंभ केला होता तर काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांचा येथेच शुभारंभ झाला होता.
तिन्ही उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, निवडणूक रंगतदार होणार
दरम्यान, तिन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर ठरते यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीतील लोकसभेला एकत्र असलेले माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी तर सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या भगीरथ भालके यांच्या प्रचाराला आल्याने जिल्ह्यातील दोन्ही खासदार विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र तयार झाले आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. सुरुवातील काँग्रेसने भगीरथ भालके यांनी तिकीट जाहीर केलं होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.