Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
भाजप महाराष्ट्रात किमान 155 जागा लढविण्यावर ठाम आहे. त्यातच शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही (अजित पवार) अधिक जागा हव्या असल्याने ‘महायुती’चे जागावाटप सध्या रखडले आहे. महायुतीत काही जागांवर वाद असून जागावाटपाचा हा तिढा भाजप पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतरच सुटणार असल्याचं दिसून येत आहे.
रत्नागिरीमधील गुहागर विधानसभा मतदार संघाच्या (Guhagar Vidhan Sabha) जागेवरुन देखील महायुतीमध्ये खेचाखेची सुरु आहे. गुहागरच्या जागेसाठी भाजपा आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुहागरमधील पदाधिकाऱ्यांनी देखील भेट घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाला एकही जागा नाही असे होणार नाही. गुहागरमधून भाजपच लढणार अशी सूत्रांची माहिती आहे. तसेच गुहागरच्या जागेबाबत बावनकुळे आणि उदय सामंत यांच्या चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
भाजपकडून सोशल मीडियावर जोरदार कँपेनिंग-
'कहो दिल से नातू फिर से...' असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदार कँपेनिंग सुरु केले आहेत. शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाच्या चर्चेनंतर भाजपकडून पहिल्यांदाच जाहीर पोस्ट करण्यात आली आहे. डॉ विनय नातू यांच्याच नावाची भाजपकडून जोरदार चर्चा सुरु आहे. पुढील दोन दिवसात गुहागरच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार की भाजप जागा लढवणार?
ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील. विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे. तर भाजपने देखील गुहागरची जागा लढवण्यावर आग्रही असल्याने ही जागा नेमकी कोणच्या वाट्याला जाणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांचा हा मतदारसंघ. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 39 हजार 663 मतदारांपैकी 59.6 टक्के म्हणजे 1 लाख 40 हजार 647 मतादारांनी मतदान केलं . पैकी भास्कर जाधव यांना 56 टक्के म्हणजे 78 हजार 748 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांना 52 हजार 297 म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी 37.2 टक्के मिळाली. पण, सध्या बेटकर सहदेव शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. तर, महायुतीमध्ये भाजपनं या मतदारसंघावर दावा केला आहे.