Maharashtra Vidhansabha Election 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरु केलीय. सर्वचर्चित आणि राजकीय सामाजिक दृष्या महत्वपूर्ण मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग-मुरुड मतदार संघात (Alibaug Assembly constituency) महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदार संघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुर्वी शेकापचा बालेकिल्ला असणारा हा मतदार संघ (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024) आता शिंदेच्या शिवसेनेकडे जरी असला तरी पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने हा गड आपल्याकडे मिळविण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. एकूणच या मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसतायेत. काँग्रेसचे प्रवीण ठाकूर अलिबाग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्या अनुषंगाने त्यांनी या मतदार संघात मोर्चे बांधणी करून रणनीती आखण्यास जोरदार सुरवात केलीय. त्यामुळे या मतदारसंघात अतिशय चूरसपूर्ण लढत होईल असेच चित्र दिसून येतंय.
ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू- प्रवीण ठाकूर
रायगड जिल्ह्यात काँग्रेसची जास्त ताकद ही अलिबाग मतदार संघात असून ही जागा आम्हालाच मिळावी असा आग्रह सुध्दा ठाकुर यांनी धरला आहे. तर शेकापने यंदा हा मतदारसंघ आम्हाला देऊन त्यांनी अन्य जागेवर उमेदवारी लढवण्याची भाषा देखील ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आता अलिबाग मुरुड मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडतीलचं आणि ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू असा विश्वास देखील प्रवीण ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलाय.प्रवीण ठाकुर हे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे मोठे चिरंजीव आहेत. शिवाय काँग्रेसचे ते महाराष्ट्र प्रदेश चिटणीससुध्दा आहेत. त्यांना प्रशासनाचा आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्यानं काँग्रेसकडून आता त्यांच्या नावाची चर्चा आहे.
अलिबाग विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली.