Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर व्होट जिहाद करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप नेते विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचा आरोप केला आहे. 


वर्षा गायकवाड यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व्होट जिहाद असा शब्द प्रयोग करून एक विशिष्ट धर्माचा अपमान करत आहेत. निवडणुकीत कोणी कोणाला मतदान करायचे हा त्या मतदाराचा अधिकार आहे. जर एखाद्या मतदारांनी किंवा काही भागातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले असेल तर त्याला व्होट जिहाद म्हणण्याचा अधिकार कोणाला नाही. संविधानाने मतदाराला दिलेल्या हक्काचे  उल्लंघन आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेले एका पत्रकार परिषदेतच यासारखी विधान केल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल असे आपण जाहीर केले होते. 






विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत


भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष श्री. आशिष शेलार यांनी 19 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकावून धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे, असे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेतय. अशा प्रकारे विधान करून भाजपा वातावरण धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आशिष शेलार यांच्या विधानाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी विनंती गायकवाड यांनी केली आहे. 


वर्षा गायकवाड यांचा आशिष शेलारांवर जोरदार प्रहार 


दरम्यान, शेलार यांनी केलेल्या ट्विटला खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार प्रहार करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, म्हटलं  घ्या.. पुन्हा एकदा अदानींचे एजंट बरळले. अदानींच्या स्वार्थासाठी आता हे नालायक सरकारचे एजंट जनतेला चक्क अर्बन नक्षलवादी म्हणाले. हे बोलताना जरा लाज-शरम वाटायला हवी होती. सत्तेच्या मस्तीत इतपर्यंत यांची मजल गेली. मुंबईत उघड-उघड होणाऱ्या जमिनींच्या लूटवर हे पडदा टाकत आहेत. मी जे प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांची उत्तरंच यांनी दिली नाहीत. आणि आशिष शेलारजी, धारावी संबंधित मुद्द्यांवर बोलण्यासाठी मला कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. धारावी माझा परिवार आहे. मी त्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात बोलणार, जो माझ्या परिवाराविरुद्ध कटकारस्थानं रचणार.


मुंबईकरांकडून त्यांच्या हक्काच्या जमिनी आणि उपजीविका हिसकावून घेत आहात


तुमच्या लबाड सरकारचा एकच लक्ष्य आहे - 'गरीब हटाओ, धारावी मिटाओ, अदानी सिटी बनाओ।' हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. तुम्हाला धारावी झोपडपट्टी दिसते पण, वास्तवात धारावी ही एक स्किल कॅपिटल आहे. इथल्या लोकांनी आणखी कुठे का जावं? तुम्ही मुंबई तुमच्या लाडक्या मित्राला विकत आहात आणि त्याचा भुर्दंड म्हणजे तुम्ही मुंबईकरांकडून त्यांच्या हक्काच्या जमिनी आणि उपजीविका हिसकावून घेत आहात, फक्त तुमच्या फायद्यासाठी.  शेलार जी, आता तुमच्या पक्षाच्या आणखी एका खोट्या कटकारस्थानावर बोलूया.. ते म्हणजे वोट जिहाद! हा फुटीरतावादी आणि बोगस शब्द वापरून तुम्ही समाजात तेढ निर्माण करून खऱ्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात. मी तुम्हाला पुन्हा सांगते की, या समोरासमोर आपण बोलू, माझ्या आणि धारावीकरांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं द्या, फेक नरेटिव्ह पसरवू नका.


इतर महत्वाच्या बातम्या