मुबंई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या या निवडणुकीसाठी जागावाटप करण्यात येत आहे. वेगवेगळे पक्ष सक्षम उमेदवाराला तिकीट देत आहेत. अशा स्थितीत वेगवेगळ्या मतदारसंघांमधून नाराजीनाट्यही पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच पक्षांत बंडखोरी, राजीनामा असे प्रकार घडताना दिसत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून भोर आणि खडकवासाला विधानसभआ मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे याच नेत्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे.
शिवसेनेने नेमकी काय कारवाई केली?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शंकर मांडेवकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. ते ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख होते. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते विनायक राऊत यांनी दिली आहे.
शंकर मांडेकर यांना अजितदादांकडून तिकीट
ठाकरेंच्या शिवसेनेने शंकर मांडेकर यांची हकालपट्टी केली असली तरी अजित पवार यांच्या पक्षाने त्यांचा मोठा सन्मान केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 28 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत एकूण दोन जागांवर उमेदवार देण्यात आले आहे. या यादीत शंकर मांडेकर यांचाही समावेश आहे. अजित पवार यांनी मांडेकर यांना भोर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. म्हणजेच मांडेकर आता भोर जागेवरून घड्याळ या तिकिटावरून निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार यांनी चौथ्या यादीत देवेंद्र भुयार यांनादेखील तिकीट दिले आहे. भुयार हे मोर्शीतून यंदाची विधानसभा निवडणूक लढवतील.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजदेखील अनेक नेते पक्षबदल, बंडखोरी करण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी आणखी रंगणार आहे. लवकरच राज्यात ठिकठिकाणी सभा, बैठकांचे सत्र चालू होईल.
हेही वाचा :