मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळं महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर बंड पुकारलं होतं. राज्यभरात 150 पेक्षा जास्त उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळं पक्षातील नेत्यांची आणि अधिकृत उमेदवारांच्या अडचणी वाढल्या होत्या. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, आणि पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी कमी झाली. या दरम्यान पक्षांनी अनेक नेत्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर - जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी - मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघात बंडखोरी केली. आघाडीचा धर्म पाळला नाही शिवाय पक्ष विरोधी वक्तव्य केल्याने ही हकालपट्टी करण्यात आली आहे. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघात बंडखोरी केली. आघाडीचा धर्म पाळला नाही शिवाय पक्ष विरोधी वक्तव्य केल्याने ही हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीतील बंडखोरी
शिवसेना- बाबुराव माने – धारावी, सुरेंद्र म्हात्रे – अलिबाग, उदय बने- रत्नागिरी, मकरंदराजे निंबाळकर – धाराशीव, कुणाल दराडे – येवला, रणजीत पाटील – परंडा.
कॉँग्रेस - मधू चव्हाण – भायखळा, तानाजी वनवे – नागपूर पूर्व, सुहास नाईक – शहादा तळोदा, विश्वनाथ वळवी – नंदुरबार, मदन भरगड- अकोला, दिलीप माने -सोलापूर, हेमलता पाटील – नाशिक मध्य, राजश्री जिचकार – काटोल, अविनाश लाड -रत्नागिरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - जयदत्त होळकर – येवला, संदीप बाजोरिया – यवतमाळ, संगीता वाझे -मुलुंड, मिलिंद कांबळे – कुर्ला.