Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूरमध्ये (Kolhapur District Assembly Constituency) महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत ते विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला आहे. सतेज पाटील काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 


कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आम्हाला द्या


दरम्यान, व्ही. बी. पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराज यांना आम्ही निवडून दिले, पण ते केवळ काँग्रेसचे खासदार असल्यासारखी वागणूक मिळत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाला लोकसभेच्या दोन्ही जागा दिल्या. आमची चार जागांची मागणी असताना केवळ दोन जागा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाटील म्हणाले. व्ही. बी. पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आम्हाला द्या किंवा तो शक्य नसल्यास कोल्हापूर दक्षिण तरी द्या अशी मागणी पाटील यांनी केली. काँग्रेसने मन मोठे दाखवून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ द्यायला हवा असे ते म्हणाले. जर मतदारसंघ दिला गेला नाही तर प्रत्येक तालुक्यात आमचा उमेदवार तयार करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा पाटील यांनी दिला. 


राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघांवरून वाद


त्यामुळे आता उमेदवारीवरून कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये घमासन सुरू असतानाच या वादामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. कोल्हापूरमध्ये जागा वाटपावरून अजूनही राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर उत्तर या तीन मतदारसंघांवरून वाद असल्याची चर्चा आहे. राधानगरी मतदारसंघ काँग्रेसने प्रतिष्ठेचा केला असून त्या बदल्यात कोल्हापूर उत्तर ठाकरे गटाला द्यायची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. शिरोळवर सुद्धा काँग्रेस आपला दावा सांगत आहे. त्यामुळे मतदारसंघ वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ कागल आणि चंदगड असे दोनच मतदारसंघ येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून इचलकरंजी मतदारसंघाची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातात याची उत्सुकता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या