तासगाव: राज्यभरातील 288 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघामध्ये आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) हे पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात माजी खासदार संजयकाका पाटील उभे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. रोहित (Rohit Patil) यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारी आणि संजयकाका (Sanjaykaka Patil) यांचे राजकीय अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक समजली जाते. अशातच आज दोन्ही उमेदवारांनी आज समोरासमोर येणे आणि भेट टाळल्याचं दिसून आलं आहे. 


नेमकं काय घडलं?


तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील  प्रतिस्पर्धी संजयकाका पाटील आणि रोहित पाटील हे एकाच वेळी चिंचणी गावच्या  मतदान केंद्रावर आले, मात्र दोघांनी समोरासमोर येणे टाळले. संजयकाका आणि रोहित पाटील दोघेही चिंचणी गावच्या मतदान केंद्रावर एकाच वेळी आल्याने या मतदान केंद्रावरील  बंदोबस्त मात्र अलर्ट करण्यात आला. मात्र, दोघांनीही समोरासमोर येणं टाळलं.चिंचणी हे संजयकाका पाटील यांचे गाव आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी आणि मतदानाचा आढावा घेण्यासाठी संजयकाका पाटील चिंचणी गावातील मतदान केंद्रावर आधी आले.


त्यानंतर काही वेळाने रोहित पाटील देखील चिंचणी मधील मतदान केंद्रावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले. मात्र दोघे एकाच मतदान केंद्रावर असताना देखील दोघांनी एकमेकांना भेटणं टाळलं. रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघांनीही एकमेकांच्या समोर येणं कटाक्षाने टाळल्याचं दिसून आलं. रोहित पाटील एका गेटने बाहेर पडले तर संजयकाका पाटील हे दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले. दोघेही एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी आल्याने पोलीस मात्र सतर्क झाले होते.


घासून नाही तर ठासून विजय होणार -संजय काका पाटील


तासगाव कवठेमहांकाळ मधून घासून नाही तर ठासून विजय होणार. आता लोकांनीच निवडणूक  हातामध्ये घेतली. गुंडागर्दी कोणाची आहे आणि कुणाची बहीण सोबत गुंड घेऊन फिरत आहे हे जनतेला माहित आहे. संजय काका पाटील यांनी रोहित पाटील आणि त्यांची बहिण स्मिता पाटील यांच्यावर टीका केली आहे. तासगाव कवठेमहांकाळ मधील माझा विजय निश्चितपणे ठरलेला आहे. तो घासून नाहीतर ठासून होणार आहे. आता लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे. तासगाव कवठेमहांकाळ मधील निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 35 वर्षांमध्ये काम काय केलं हे सांगताना न आल्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे. माझी गुंडगिरी असती तर लोक माझ्यासोबत आले नसते. गुंडगिरी कुणाची आहे, कुणाची बहीण खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सोबत घेऊन फिरत आहे. हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. रोहित पाटील यांच्याकडून प्रचंड पैसे वाटप करण्यात आल्याचे सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटील आणि त्यांची बहीण स्मिता पाटील यांच्यावर टीका केली.