कोल्हापूर : माजी आमदार के.पी.पाटील साहेब (Prakash Abitkar on K P Patil) यांच्या निष्क्रियतेमुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सलग दोन वेळा जनतेने निवडून दिले. लोकांच्या मनातील असलेल्या विकासाच्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी अहोरात्र झटतो. मात्र, माजी आमदारांना 10 वर्षाच्या काळात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत, अन्यथा त्यांना मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. राधानगरी मतदार संघातील जनता अनेक वर्ष विकासापासून दूर होती. गेल्या 10 वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावली आहे. अजून अनेक कामे पूर्ण करावयाची असून भविष्यात राज्यातील प्रगत मतदारसंघ म्हणून राधानगरीची ओळख निर्माण करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. प्रकाश आबिटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तुरंबे (ता.राधानगरी) याठिकाणी करण्यात आला. 


हजारो कोटी रुपयांचा निधी आणणारा जिल्ह्यातील एकमेव आमदार


खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास झाला आहे. दुसरीकडे, मात्र लबाडीचे राजकारण करून लोकांना फसविण्याचा उद्योग सुरू आहे. राधानगरी मतदारसंघात रस्ते, आरोग्य, पाणी, विज, लघु प्रकल्प यासारखे रखडलेल्या प्रश्नांसाठी केवळ 2 वर्षाच्या कालावधीत हजारो कोटी रुपयांचा निधी आणणारा जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून आमदार आबिटकर यांचा उल्लेख करावा लागेल. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लाऊन काम करणाऱ्या माणसाला राधानगरी मतदार संघातील जनता एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी करेल. 


राधानगरीचा बाजीगर वाजत-गाजत विधानसभेमध्ये पाठवतील


शेतकऱ्यांना आणि बहीणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्य आमदार प्रकाश आबिटकर यांना मतदार विजयी करून राधानगरीचा बाजीगर वाजत-गाजत विधानसभेमध्ये पाठवतील प्रा.जालिंदर पाटील यांनी व्य़क्त केला. लोकसभेला संविधान बदलणार असे फेक नरेटीव्ह पसरवून दलीत समाजाची दिशाभूल केली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विधानसभेला दलित समाज अशा खोट्या भूलथापांना बळी पडणार नसून विकासाचे आयडॉल असणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय दलित समाजाने घेतला असल्याचे आरपीआय राज्य सरचिटणीस प्रा.शहाजी कांबळे यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या