मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेताच मोहसीन हैदर हे प्रचारात सक्रिय झाले असल्याचे पाहायला मिळाले. मोहसीन हैदर यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक जाधव (Ashok Jadhav) यांना एक प्रकारे बळ मिळाले आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक जाधव यांच्या अंधेरी पश्चिमेकडील डी एन नगर येथील विधानसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले 


या प्रसंगी मोहसीन हैदर यांनी उपस्थिती लावून आपण नाराज नसल्याचे दाखवून देत प्रचारात सक्रिय झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना हैदर म्हणाले अंधेरी पश्चिम विधानसभेची जागा आम्ही दहा हजार पेक्षा अधिक मतांनी जिंकणार आहोत. आमची लढाई ही सांप्रदायिकते विरोधात आहे. मुंबईत आम्हाला कमी जागा मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते कार्यकर्त्यांमध्ये राग होता. मात्र हळूहळू कमी होत आहे आम्ही फक्त अंधेरीच नाही तर वर्सोवा देखील महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत, असा दावा मोहसीन हैदर यांनी केला.


संजय राऊतांच्या भावावर पोलिसांकडून गुन्हा दाखल


विक्रोळी विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना महागात पडले आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात या बाबत कलम 79, 351(2), 356(2) बीएनएस अंतर्गत रात्री उशिरा करंजे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील राऊत यांनी 27 ऑक्टोबरला टागोर नगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार करंजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कार्यकर्त्यांना संबोधित  करताना, हिंदीमध्ये ते म्हणाले की, 'जब बकरा बनाना ही था, तो बकरी को मेरे गले मे डाल दी, अभी २० तारीख को काटेंगे बकरी को', असे आक्षेपार्ह  विधान केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या विक्रोळी पोलिसांनी करंजे यांच्या तक्रारीवरून  रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विक्रोळी पोलीस करीत आहेत.


टक्कर बरोबरीची झाली पाहिजे. मी सुनिल राऊत आहे, मी संजय राऊतांचा भाऊ आहे, ज्यांनी मोदी आणि शहाला हलवले तशी टक्कर देखील झाली पाहिजे. माझ्यासमोर उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही. महायुतीने सुवर्णा करंजे यांना आता 'बकरी' बनवून माझ्या गळ्यात टाकले आहे. ही बकरी 20 तारखेला कापायची, असे सुनील राऊत यांनी म्हटले होते. सुनील राऊत यांच्या या वक्तव्यावर सुवर्णा करंजे यांनी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात तक्रार केली. 


आणखी वाचा


मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट