पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघाताचं प्रकरण या निवडणुकीत अद्यापही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारचालक अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले, या प्रकरणात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं गेलं होतं. त्यांच्यावरती आरोप देखील करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या प्रकरणावर त्यांच्यावर टीका होताना दिसते. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना आमदार सुनील टिंगरेंवर हल्लाबोल केला आहे.


महायुतीसारखी घाण महाराष्ट्रात राहता कामा नये. श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं मारली जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी आमदार कामाला लागतो, अशी टीका संजय राऊतांनी सुनील टिंगरेवर केली आहे. बेईमान आणि गद्दारांचा राज्य राज्यात चालू आहे, असंही राऊत म्हटलं आहे. 


 राज्यात मविआचे सरकार आल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत नसतील
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या दोघांनाही महाराष्ट्राचा विकास झालेला नको आहे. मराठी माणसाचा विकास झालेला या दोघांना नको आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. सगळ्या गोष्टी हे दोघं महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत आहेत. महाराष्ट्र जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, तेव्हा नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत नसतील लिहून घ्या असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 


संजय राऊत पुणे दौऱ्यावर


शिवाजीनगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारासाठी संजय राऊत पुणे दौऱ्यावर आले आहेत, यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लोकांनी ठरवलं आहे की, दत्ता बहिरट यांना विजयी करायचं आहे. महाविकास आघाडी मजबुतीने पुढे चालली आहे. त्यामुळे महायुतीसारखी घाण महाराष्ट्रात राहता कामा नये. श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं मारली जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी आमदार कामाला लागतो असे म्हणत नाव न घेता संजय राऊतांनी सुनील टिंगरेंना 
लक्ष्य केलं आहे.


हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य


कोण फडणवीस, कोण एकनाथ शिंदे आणि कोण अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. हे राज्य शाहू फुले आंबेडकर यांचं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच आहे. या निवडणुकीत दादागिरी करण्याचा प्रयत्न कराल तर निवडणूक आयोगाला माझा आवाहन आहे की तुम्ही लक्ष घाला. दादागिरी आणि मारामारी करण्यात आमचं आयुष्य गेलं असं म्हणत संजय राऊतांनी इशारा दिला आहे.