Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Nikal 2024) 288 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी या नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (आज) सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सत्ताधारी भाजप प्रणित महायुती (Mahayuti) आणि सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील लढतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदु राहिलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व 288 मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदारसंघात साधारणत: मतमोजणीच्या 20 फेऱ्या पार पडतील. त्यामुळे अनेक मतदारसंघांमधील निकाल येण्यासाठी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागू शकते.
6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी केलं मतदान-
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला 17 सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.