Kolhapur District Assembly Constituency : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करताना ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. आज (23 ऑक्टोबर) के. पी.पाटील यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात लढत देतील अशी चिन्हे आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून के.पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए वाय पाटील यांच्यामध्ये चांगली चुरस निर्माण झाली होती. दोघांनी सुद्धा विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र, पक्ष मात्र  निश्चित झालेला नव्हता. 

ए. वाय. पाटील कोणती भूमिका घेणार?


दोघेही मेहुणे पाहुणे महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. आता ठाकरे गटामधून के पी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्यास ए. वाय. पाटील कोणती भूमिका घेणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराजांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. तेव्हापासून के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यामध्ये उमेदवारासाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र आता के पी. पाटील यांनी मशाल हाती घेतल्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा शिवसैनिक नाराज झाला आहे. 

निष्ठावंत शिवसैनिकांची पुन्हा निराशा


प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात सामान्य शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी मतदारसंघातून करण्यात येत होती. मात्र के. पी. पाटील यांनीच मशाल हाती घेतल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दुसरीकडे त्यांचे मेहुणे ए वाय पाटील हे सुद्धा उमेदवारीसाठी ठोकून असल्याने ते आता नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, दोघांमध्येही पक्षप्रवेशसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, ए. वाय. पाटील यांचे प्रयत्न तोकडे पडल्याची चर्चा रंगली आहे. 

पी. एन. पाटील यांच्या निधनाने ए. वाय. पाटील यांची ताकद कमी पडली


लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी झोकून देत शाहू महाराजांचा प्रचार केला होता. त्यामुळे महाराजांना सर्वाधिक 80 हजार मताधिक्य मिळाले होते. ए. वाय. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत शाहू महाराज यांना साथ देत राधानगरीतून मताधिक्य देण्यात महत्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळे पी. एन. पाटील यांनीही त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र. पी. एन. पाटील यांच्या अकाली निधनाने दिलेला शब्द मागे पडला आहे. त्यामुळे ए. वाय. पाटील यांची कोंडी झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या