Parvati Assembly Constituency: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. पक्ष आपापल्या मतदासंघात सुरू असलेले बंड शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, या दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे.  ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ पर्वती विधानसभा मतदारसंघ या आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स लागले आहेत.


पर्वती विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून पर्वती विधानसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाईल अशी चर्चा सातत्याने सुरू होती. पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आबा बागूल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम हे अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. दोन्ही पक्षाकडून ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, अखेर ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली, या मतदारसंघातून पुन्हा एकदा अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.


पर्वती मतदारसंघातून गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल निवडून आलेले आहे. आबा बागूल यांनी 2009 पासून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आबा बागुल यांना संधी देण्यात आली नाही. आबा बागूल यांनी नाराज होऊन पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे, मात्र काँग्रेसने बंड केलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्यामुळे आबा बागुल कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. 


पर्वती मतदारसंघात तिरंगी लढत


पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याआधी पक्षाने त्यांची समजूत काढली किंवा त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर भाजप विरूध्द शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात ही लढत होईल.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 तारखेपर्यंत आहे. यादरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ पर्वती विधानसभा मतदारसंघ या आशयाचे फ्लेक्स लागले आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, मात्र आबा बागुल काय निर्णय घेणार यावरती सर्व समीकरणं अवलंबून आहेत.