मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय धुरळा उडत आहे. प्रचारसभा, दौरे, रॅली राज्यभरात होत आहेत, याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना शिंदेनी ⁠मुख्यमंत्रीपद आणि स्ट्राईक रेटमुळे कसा कॉन्फिडन्स वाढला याबाबत भाष्य केलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत एकनाथ शिंदे?


लोकसभेमध्ये मोठा निकाल लागणार होता तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची जनतेच्या मनातली याबाबतचा.... आपला स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त आला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेळी मनातली भीती कमी झाली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बिलकुल, सहाजिकच आहे. शिवसेनेचा मूळ किंवा जो बेस आहे. जो बेस वोटर आहे तो आज आमच्याकडे आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर फाईट केली यामध्ये आम्ही 13 जागांवर समोरासमोर लढलो होतो यामध्ये आम्ही सात जागांवर विजय मिळवला.



स्ट्राईक रेट आमचा जास्त आहे. व्होट शेअर देखील आमचा जास्त आहे, कोकणामध्ये एकही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेली नाही, ठाणे गेलं. आज सगळं जे आहे त्यात आम्हाला आज समाधान आहे, कारण लोकांनी आम्हाला फेवर केलं. लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला, काम करणारा मुख्यमंत्री काम करणारा पक्ष म्हणून शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला त्यांनी मतदान केलं. आम्हाला याच्यात समाधान आहे. त्यांना मुंबईतल्या टेंडर मधल्या स्ट्राईक रेट मध्ये जास्त समाधान आहे. त्याला आम्ही काय करणार असं एकनाथ शिंदे.


महायुतीचंच सरकार येणार ही 'काळ्या दगडावरची भगवी रेख' - शिंदे


राज्यात महायुतीचे सरकारी येणार आहे. यामध्ये कोणती शंका नाही त्याचबरोबर महायुतीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेख आहे असं एकनाथ शिंदे म्हणालेत. एबीपी ला दिलेल्या मुलाखती वेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कारण आम्हाला विश्वास आहे, गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये आम्ही केलेलं काम आणि अडीच वर्ष त्यांनी बंद पडलेलं काम आणि आम्ही सुरू केलेलं काम, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना, या लोकांच्या मनामध्ये एकदम घर करून बसल्या आहेत. या राज्याला पुढे न्यायचं असेल, पुढे प्रगती करायचे असेल तर महायुती काळाची गरज आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.


'मी ठाकरेंना सांगत होतो..... 


'तुमचं एक वाक्य चांगलंच गाजतंय ते म्हणजे मला हलक्यात घेतलं आणि मी सरकार उलटवलं,  हलक्यात घेणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्यांना सांगत होतो. आपण शिवसेना भाजप म्हणून लढलो आहे. आपण मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून प्रचार केला आहे आणि लोकांनी त्यामुळे आपल्याला मतदान केलं आहे. पुन्हा आपण शिवसेना भाजप असं सरकार आणूया पुन्हा सगळं झालं गेलेले विसरून जाऊयात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


जर भाजपा शिवसेना सरकार झाला असता तर मी मुख्यमंत्री झालो असतो का? नाही, पण मग त्यावेळेस त्यांना (ठाकरेंना) असं वाटलं असेल हा काय बोलतो आहे, याला काय महत्त्व द्यायचं, याला काय माहिती आहे आणि मग जेव्हा आम्ही तीन चार पाच वेळा बोललो आणि जेव्हा मला कळलं आता काही बदल होणार नाही. त्यानंतर काही आमदार माझ्यासोबत होते तेही आग्रही होते .त्यांना भीती होती. आम्ही काय फेस करणार निवडणूक होती. कशी लढवणार कोणत्या मुद्द्यावर आम्ही ती निवडणूक लढवणार आणि आम्ही मतदारसंघांमध्ये काय काम करणार, फंड मिळत नाही, तिकडे विचारधारा सोडली मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.