Maharashtra Vidhan Sabha Election : भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सदाभाऊ खोत आज (18 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. दोन्ही नेत्यांनी एकत्रित भेट घेत सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघांसाठी फिल्डिंग लावत मतदारसंघांची मागणी केली आहे. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी किमान अडचणीतला मतदारसंघ संघटनेला देण्याची मागणी केली. वाळवा इस्लामपूर मतदारसंघातून रयत क्रांतीला संधी द्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावली आहे.


कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक इच्छुक


दुसरीकडे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. मात्र, हा मतदारसंघ शिंदे गटाला जाणार असल्याची चर्चा आहे. 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये 80 हजारांहून अधिक मते भाजपने मिळवली होती. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. मात्र ही जागा एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केल्याने ती त्यांना सुटेल अशी शक्यता आहे.


सांगली जिल्ह्यात अजित पवार गट शरद पवार गटाविरोधात दोन जागा लढवणार


दरम्यान, सांगली जिल्ह्यातील महायुतीतुन दोन विधानसभा अजित पवार गटाकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. वाळवा आणि तासगाव या विधानसभा अजित पवार गट लढवण्याचे संकेत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विरोधातच अजित पवार वाळवा आणि तासगाव विधानसभा क्षेत्रात उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना अजित पवार गटांकडून उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या  आहेत. संजयकाका पाटील मुंबईत जाऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.


वाळवामधून जयंत पाटील आणि तासगाव-कवठेमंकाळमधून रोहित आर आर पाटील यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून जवळपास निश्चित आहे. या दोन उमेदवारांविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार घड्याळच्या चिन्हावर उमेदवार देण्याचा विचार करत आहेत. याला कारण म्हणजे या दोन्ही मतदारसंघात जयंत पाटील आणि आर आर पाटील यांच्यामुळे घड्याळ चिन्ह रुजले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी वाळवामधून जयंत पाटील यांचे विरोधक भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनाच घड्याळ चिन्हावर उभे करण्याचा महायुतीतून प्लॅन आखला जात आहे. तासगाव कवठेमंकाळमधून रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय काका पाटील मुलगा प्रभाकर पाटील यांना घड्याळ चिन्हावर लढवण्याची तयारी करत आहेत. या दोन जागांवर घोषणा लवकरच होण्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या