Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून मतभेद सुरूच आहे. त्यामुळे अजून काही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कायम राहिला आहे. दरम्यान, विदर्भातील जागा संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसचे विदर्भातील नेते सुनील केदार मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. तिढा असलेल्या सगळ्या जागासंदर्भात सखोल चर्चा आणि त्या ठिकाणची स्थिती याबाबत सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

  


रामटेकच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये पुनर्विचार होणार का?


त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ठाकरे गटाकडून काही जागा घोषित करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये रामटेकच्या उमेदवारीचा सुद्धा पुनर्विचार होऊ शकतो. ठाकरे गटाकडून रामटेकमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक हे इच्छुक आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी विशाल बरबटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रामटेकच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये पुनर्विचार होणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे.


दरम्यान, विदर्भातील ज्या उर्वरित जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा अजूनही तिढा कायम असलेल्या सुटणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ कमी होत चालल्याने ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सुनील केदार यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर ते आता उद्धव ठाकरे यांच्याकडून विदर्भातील काही जागांवर आग्रह सोडला जातो का याकडे लक्ष असेल. 


आम्ही शतक झळकावण्याच्या जवळ आहोत


दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते राऊत आज म्हणाले की, "उर्वरित जागांवर गुरुवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल." राऊत यांनी 100 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्याची क्रिकेट सामन्याशी तुलना करताना राऊत म्हणाले की, आम्ही शतक झळकावण्याच्या जवळ आलो आहोत. आम्ही दोन-तीन षटकार मारू. आम्ही 85 धावा केल्या आहेत आणि सामना अजूनही सुरू आहे. उरलेल्या धावा आम्ही करू. एमव्हीएने तीन घटक पक्षांना 85-85 जागा देण्याचा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. बुधवारी त्यांच्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत काही सुधारणा होऊ शकतात, असेही ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या