Chhagan Bhujbal: निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटलं, ही पाकीटमारांची टोळी आहे. त्यांच्यात हिंमत होती, तर अजित पवार म्हणाले असते, शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतलं, तसं मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी चोरून माझी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणालेत छगन भुजबळ?
मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळेला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधाने केल्यामुळे अनेकदा अडचणीत आलेला आहात. हे लक्षात ठेवा आणि माझा सल्ला राहील त्यांना आहे. मानायचा की नाही त्यांनी पाहावं. परंतु आपण शब्द कुठले वापरावेत यांचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि ते विचारपूर्वक वापरले पाहिजेत. आपण कोणाला काय बोलतो कोणाला पाकीट मार म्हणतो त्याचा विचार करावा. ज्यांनी 20-30 वर्ष तुमच्यासोबत काम केलं, उभे राहिले. ते सगळ्यांना ते लागू होतं. मला असं वाटतं की एवढ्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांना राजकीय आयुष्यामध्ये पुढे आणण्यासाठी शरद पवारांचा हात आहे आणि छगन भुजबळ यांचा देखील त्यामध्ये वाटा आहे. हे त्यांना माहिती आहे ज्यावेळी तुम्ही एखादं विशेषण लावता पार्टीला त्यामुळे ते सर्वांनाच दुःखदायक वाटतं. त्यामुळे थोडसं सांभाळून शब्द त्यांनी वापरले पाहिजेत.
अजित पवार खरंच जर मर्द असतील त्यांनी नवीन चिन्ह घेऊन पक्ष स्थापन केला असता. त्यांनी शरद पवारांकडून चिन्ह घेतलं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मी याचे उत्तर दिलेलं आहे आणि आता निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट त्या सर्वांनी दिलेलं आहे, जे नियम ठरलेले असतील त्यानुसार अजित पवारांना हे पक्ष आणि चिन्हं मिळाला आहे.
नवाब मलिकांना मदत करण्यावर काय म्हणाले भुजबळ?
शिवसेना शिंदे गट आणि भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिकांना मदत करणार नाही यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ठीक आहे. याची कल्पना नवाब मलिक यांना सुद्धा आहे. तो मतदार संघ हा मलिकांचा गड आहे. तिथे त्यांनी आधी खूप काम केलेला आहे. ते आधीही निवडून आलेले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांना विजयाचा विश्वास आहे. प्रत्येक मतदारसंघांमध्ये परिस्थिती वेगवेगळी असते. प्रश्न वेगवेगळ्या असतात. उमेदवार उभे असतात त्यांचा त्या मतदारसंघासोबत संबंध वेगळा असतो. त्यामुळे मला असं वाटतं जिंकून येतील असा विश्वास देखील छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.