मुंबई: महाराष्ट्रातील मतमोजणीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीसमोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्या (शनिवारी) मतमोजणी होणार असून, त्यानंतरच जनतेने कोणत्या आघाडीला निवडले त्याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र त्याआधीच सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) पुढील सरकारचे नेतृत्व कोण करणार यावरून मतभेद निर्माण झाले असून, दोन्ही गटातील पक्ष मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत. मात्र, आत्तापर्यंत समोर आलेल्या पोलनुसार, महायुतीचे सरकार (Mahayuti) स्थापन होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, महायुतीचे सरकार स्थापन झाले तरी देखील मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी (CM Post) स्ट्राईक रेट महत्त्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या पाच निवडणुकात भाजपचा (BJP) स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा (Shivsena) जास्त आहे. यंदाही भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त राहील का? याकडे लक्ष्य लागलं आहे. मुख्यमंत्री पदावरील दावा स्ट्राईक रेटच मजबूत करेल का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पद कोणाकडे याचा निर्णय तिन्ही पक्ष चर्चा करून करू असे जरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते बोलत असले. तरी संख्याबळ आणि जिंकण्यासंदर्भातला स्ट्राईक रेट हेच निकष मुख्यमंत्री पदासाठी लागू केले जाईल अशीच दाट शक्यता आहे. मात्र गेल्या पाच निवडणुकातला भाजप आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहिला तर भाजपच त्यामध्ये नेहमीच सरस ठरल्याचे दिसून येते.
गेल्या पाच निवडणुकातला भाजप आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट
1) 1999 मध्ये भाजपचा स्ट्राइक रेट लढलेल्या जागांच्या तुलनेत 48% होता.
2) 2004 मध्ये 49%, 2009 मध्ये 39 %, 2014 मध्ये जेव्हा सर्वच पक्ष वेगवेगळे लढले त्यावेळेस 47% एवढं स्ट्राईक रेट भाजपने ठेवला होता.
3) 2019 मध्ये मात्र त्यात घसघशीत वाढ होऊन तो 69% झाला होता.
4) त्या तुलनेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट 1999 मध्ये 43%, 2004 मध्ये 38%, 2009 मध्ये 28%, 2014 मध्ये भाजपपासून वेगळं लढल्यामुळे फक्त 22 टक्के एवढे राहिला होता.
5) 2019 मध्ये मोदी 2.0 च्य लाटेत शिवसेनेचा स्ट्राइक रेट ही सेनेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 45% झाला होता.
6) 2024 च्या निवडणुकीत भाजपने 147 जागांवर निवडणूक लढविली आहे. पुन्हा एकदा संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त राहील अशीच दाट शक्यता आहे.
7) मात्र गेल्या पाच निवडणुकीसारखाच यंदाही भाजप स्ट्राईक रेटमध्ये शिवसेनेला मागे सोडेल का?? आणि त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदावरील दाबा मजबूत होईल का असा प्रश्न असून त्याचा उत्तर उद्याच मिळू शकणार आहे.