नवी दिल्ली :  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नवी दिल्लीत बैठका सुरु आहेत.  भाजपच्या नवी दिल्लीतील बैठकीत 105 विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बैठकीत बोरिवली विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. भाजपचे बोरिवलीचे आमदार सुनिल राणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, या मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 


भाजपचे सुनिल राणे आमदार असलेल्या बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या दिल्लीतील बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे.  गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये मतांतर झाल्याची माहिती आहे.  


लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापलं गेलं होतं. त्यामुळं गोपाळ शेट्टी यांचं पुर्नवसन करण्याची विनंती मुंबईतील नेत्यांकडून करण्यात आली आहे.  मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, तो नेता नेमका कोण याचं नाव समोर आलेलं नाही. 


बोरिवली विधानसभेबाबत कालच्या भाजपच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितलं असल्याची माहिती आहे. 


गोपाळ शेट्टी यांचं पुनर्वसन होणार?


गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. भाजपनं या मतदारसंघात त्यांच्या जागेवर पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. गोपाळ शेट्टी यांची त्यावेळी भाजपच्या वरिष्ठांकडून समजूत काढण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे गोपाळ शेट्टी यापूर्वी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. 2009 ला ते या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.2014 ला विनोद तावडे यांनी या जागेवरुन निवडणूक लढवली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुनिल राणे विजयी झाले होते. सुनिल राणे यांना 123721 मतं मिळाली होती. तर, काँग्रेसच्या कुमार खिलारे यांना 28619 मतं मिळाली होती. 


भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल दिल्लीत पार पडली. संध्याकाळी अडीच तास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर सगळे महाराष्ट्र भाजपचे नेते दिल्लीतून माघारी आले.  देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी होते. बैठक संपल्यावर ते पुन्हा भाजप मुख्यालयात पोहोचले होते. बैठकीत भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. याशिवाय भाजपाला समर्थन देणाऱ्या 11 अपक्षांच्या जागेवर विचारमंथन झालं. 


एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्यावर उर्वरित जागांविषयी पुन्हा बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. 


इतर बातम्या :


BJP List : भाजपच्या 30 टक्के आमदारांचा पत्ता कट, 110 नावांवर शिक्कामोर्तब; शुक्रवारी पहिली यादी जाहीर होणार