पुणे: विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व पक्ष रिंगणात उतरले आहेत. राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडत आहे, अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वणीमध्ये काल(सोमवारी) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी केली. त्यावरून उध्दव ठाकरे संतापले, त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती प्रसारीत केला आहे, त्याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांनी माझी सोडून आणखी कोणाची बॅग तपासली असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वातावरणं तापताना दिसत आहे, या प्रकरणावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल करत घाबरायचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला आहे. 


भाजप नेते अशिष शेलार यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती केंद्रीय मंत्र्यांना अटक..कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत..कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर, कुणाचे फोडले डोळे अशा शब्दात उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे.


अशिष शेलार यांची सोशल मिडिया पोस्ट


घाबरायचे कारण काय?
जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती केंद्रीय मंत्र्यांना अटक..
कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत..
कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर
कुणाचे फोडले डोळे..
मुख्यमंत्री असताना केवढे केले होते यांनी अनधिकृत चाळे..


काल त्यांचे नुसते विमान तपासले म्हणून केवढे झाले ओले


युतीच्या मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी तपासले होते विमान
तीच यंत्रणा वागली तुमच्याशी ही कायद्याने समान !


मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय?
लोकशाही आणि नियतीच्या दरबारात असतो समान न्याय ! 






उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर काय म्हणाले शरद पवार?


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅग तपासणीच्या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, सत्ता त्यांच्या हातात आहे, सत्तेचा कसा उपयोग करायचा हे त्यांच्या ठरवलेलं आहे, विरोधकांना त्रास देण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा त्रास सहन करावा लागेल. यावर नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. सामान्य लोकांना ही कळतं, विरोधकांना असा त्रास देणं लोकांना ही फारसे आवडेल असे नाही, मात्र या गोष्टीचा निवडणुकीवर परिणाम होईल असे नाही, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.


अजित पवारांची उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर प्रतिक्रिया


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅग तपासणीच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, माझ्यापण बॅगा तपासल्या आहे. परभणीला, बेळगाव तपासल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बॅगा तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्याच्या बॅगा पण तपासल्या होत्या. पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.