Maharashtra Vidhan Sabha Election 2024  : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजपने बाजी मारताना (BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024) पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 13 महिला सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मुंबईमधून 14 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.  पश्चिम महाराष्ट्रामध्ये विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विदर्भामध्ये उमेदवारांना सर्वाधिक कुणबी उमेदवारांना संधी देण्यात आली असून मराठवाड्यामध्ये मराठा चेहरा देण्याकडे भाजपने कल दिला आहे. दरम्यान, भाजपची दुसरी यादी सुद्धा आजच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा एकदा डबल बार 


दरम्यान, भाजपची पहिली यादी समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या फॉर्म्युलाची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमधील फॉर्मुला कसा असेल याबाबत आता सर्वसाधारण चित्र समोर आलं आहे. यानुसार भाजप 158 जागांवर राज्यात उमेदवार देणार असून शिवसेना शिंदे गट 85 जागांवर उमेदवार रिंगणात असतील, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अवघ्या 45 जागा असतील असे चित्र समोर येत आहे. त्यामुळे उमेदवारीच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या तुलनेमध्ये डबल बार केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. दरम्यान, भाजपने पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का लावला, नसला तरी दुसऱ्या यादीत मात्र दे धक्का चित्र असेल, अशी चर्चा आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत नवे चेहरे सर्वाधिक असतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदारांना दुसरी यादी येईपर्यंत देव पाण्यात घालावे लागतील, अशीच चर्चा आहे.  



शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता


दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये 50 उमेदवार असतील असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून बंडाळी केल्यानंतर त्यावेळी साथ दिलेल्या सर्वच आमदारांना पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं जाईल असं बोललं जात आहे. अजित पवार यांच्याकडूनही यादी लवकरात लवकर जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे. दरम्यान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये मराठवाडामध्ये 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये आता भोकर या मतदारसंघाची वाढ झाल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप उमेदवार असतील. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई येथून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मागीलवेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. छत्रपती संभाजी नगरमधून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने त्या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या