माढा: माढ्याच्या उमेदवारीसाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. अभिजीत पाटील यांनी बाजी मारली आणि काल रात्री त्यांच्या हातात पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला. यानंतर अभिजीत पाटील यांनी तातडीने अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. अभिजीत पाटील आणि जरांगे पाटील यांचे संबंध खूप चांगले असून यामुळेच अभिजीत यांनी जरांगे यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळाल्याचे सांगितले जाते. माढ्यातून उमेदवारीचा प्रयत्न सुरू करतानाही अभिजीत पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. आता शरद पवार यांनी विश्वास दाखवल्यानंतर अभिजीत पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने आता विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटात उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
आमदार बबन शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार असून लोकसभा निवडणुकीत जरांगे इफेक्टमुळे माढा विधानसभेतून जवळपास 55 हजार मतांची पिछाडी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली होती. यामुळेच सावध होत आमदार शिंदे यांनी अजितदादांची साथ सोडत आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार किंवा अपक्ष लढवू मात्र महायुतीचे तिकीट घेणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली होती. गेले आठ दिवस उमेदवारीसाठी ते शरद पवार यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र,अखेर शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या हातात तुतारी सोपवली.
काल (सोमवारी) बबनदादा शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी माढा शहरांमध्ये विराट रॅली घेत मुलगा रणजीत शिंदे याला तुतारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवायचे का असा सवाल कार्यकर्त्यांना केला होता. याचे कारणही तसेच होते जो जरांगे इफेक्ट माढा विधानसभेत दिसला होता ते पाहता कार्यकर्त्यांची भूमिका ही आमदार शिंदे यांनी तुतारी घेऊनच निवडणूक लढवावी अशी होती. मात्र पवारांनी डावल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती.
काल (सोमवारी) रात्री शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतल्यावर बबन शिंदे यांना पवारांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांची शरद पवार गटाची दार आता पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांची आज भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष असून आज उमेदवारी दाखल करायचा शेवटचा दिवस आहे आणि अद्याप महायुतीने माढ्यातील उमेदवार जाहीर केलेला नाही. ही जागा अजित पवार गटात असली तरी जर अजित पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसेल तर ती जागा शिंदे यांच्या शिवसेनेला पाहिजे आहे. शिंदे यांच्या गटाकडून ओबीसी नेते शिवाजी कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून आज अजित पवार काय भूमिका घेणार यावर माढ्यातील महायुतीचा उमेदवार निश्चित होणार आहे.
सध्या तरी अभिजीत पाटील यांनी तुतारी जशी बाजी मारली तशीच जरांगे यांच्याशी भेट घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा जरांगे पाटील महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवार देणार असून माढ्यातून त्यांचे निकटवर्तीय धनाजी साखळकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता जरांगे माढ्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे येत्या 30 तारखेला दिसणार असले तरी अभिजीत पाटील यांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन देत जरांगे यांची भेट घेतल्याने माढा मतदारसंघातील मराठा मतदार कोणाला कौल देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.