पुणे : आज राज्यात विधानसभेसाठीच्या 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. नागरिक मतदान केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान करत आहेत. आतापर्यंत राज्यात 50 टक्क्यांच्या वरती मतदान झालं आहे. परंतु, आता शेवटच्या काही क्षणामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं, यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातील 8 मतदारसंघांमध्ये 5 वाजेपर्यंत 54.09 टक्के मतदान झालं आहे.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
वडगाव शेरी 50.46 टक्के.
शिवाजीनगर 44.95 टक्के.
कोथरूड 47.42 टक्के.
खडकवासला 51.56 टक्के.
पर्वती 48.65 टक्के.
हडपसर 45.02 टक्के.
पुणे कॅन्टोन्मेंट 47.83 टक्के.
कसबा पेठ 54.91 टक्के.
भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब
पुणे जिल्ह्यातील भोसरी मतदारसंघामध्ये (Bhosari Assembly constituency) अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. त्यानंतर मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आठवड्याभारपूर्वी मतदार यादीत असणारी नावं डिलीट झाल्याचा आणि हडपसर, बारामती अशा विविध विधानसभेत नावं टाकल्याचा, दावा मतदारांनी केला आहे. यामागे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत असल्याचा आरोप या मतदारांकडून करण्यात आला आहे. ही साडे हजार मतं एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतात. हे पाहता घडल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील नागरिकांना घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन नेतेमंडळी, कलाकार करताना दिसत आहेत.
पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुण्यात अनेक शक्कल लढवल्या जात आहे. मतदान केलेली शाई दाखवा आणि एक पुस्तक मोफत मिळवा, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पुण्यातील शनिवार पेठेतील गणपती मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. अनेक पुणेकर मतदानाचं बोट दाखवून पुस्तक घेऊन जात आहेत. आम्हाला सुरक्षित ठेवणारं सरकार हवंय, असं मत पुणेकरांनी व्यक्त केलं आहे.
खेड शिवापुर टोलनाक्यावरची सातारहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक टोल फ्री
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरची पुण्यातील खेड शिवापुर टोलनाक्यावची सातारहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक टोल फ्री करण्यात आली आहे. पुण्याच्या दिशेने येणार्या वाहनांची गर्दी जास्त असल्याने लोक मतदानापासुन वंचित राहू नयेत यासाठी प्रशासनाच्या सुचनेवरुन ही एकेरी वाहतुक टोल फ्री करण्यात आली आहे.