Maharashtra Politics, Ajit Pawar : प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांला आपला नेता आणखी मोठा व्हावा, मोठ्या पदावर जावं असं वाटत असते. कार्यकर्ते देखील त्यासाठी झटत असतात. सध्या त्यातलंच एक ताजं उदाहरण आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा सिलसिला सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका विषयाने डोकं वर काढलंय. हा मुद्दा पहिल्यांदाच आलाय असं नव्हे तर यापूर्वीदेखील राष्ट्रवादीतल्या बड्या नावांची चर्चा होती. चर्चा कशाची तर मुख्यमंत्रीपदाची. त्याचं झालं असं की 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार' अशा आशयाचे फ्लेक्स मुंबईत लागलेत. हे होर्डिंग्स लागले काय आणि एकच विषय सध्या जोरदार सुरु आहे तो म्हणजे अजित पवार यांचा मुख्यमंत्री होण्याचा. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं, ते म्हणाले की, 'हे अतिउत्साही कार्यकर्त्यांचं काम असतं. उद्या कोणी भावी पंतप्रधान म्हणून ही फ्लेक्स लावेल, पण बहुमत मिळाल्याशिवाय काही काम नाही.' पण नेमकं काय घडलंय...? पाहूयात याबाबत सविस्तर... 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापाठोपाठ आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर होणारे मुख्यमंत्री कोण असतील याची चर्चा आतापासूनच यामुळे सुरु झाली आहे. हे होर्डिंग्स लावलेत कुठे तर..मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हे होर्डिंग लागलंय "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीने हा फ्लेक्स लावला आहे, त्याच मात्र नाव त्या ठिकाणी लिहिण्यात आलेल नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत पत्रकारांनी थेट अजितदादांनाच विचारलं.... ते म्हणाले की, जो पर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. बॅनर लावणं हे त्या कार्यकर्त्यांचं वैयक्तिक समाधान, असं अजित पवार यांनी सांगितलंय...  


काय म्हणाले अजित पवार ?
भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावले असतील तर त्याला जास्त महत्व देऊ नका, उद्या तुमचेही तसे फ्लेक्स लावले जाऊ शकतात. "आमच्यात स्पर्धा नाहीत. तुम्ही खूप मनावर घेऊ नका, फार महत्व देऊ नका. जो पर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. बॅनर लावणं हे त्या कार्यकर्त्यांचं वैयक्तिक समाधान आहे. हे अतिउत्साही कार्यकर्त्यांचं काम असतं. उद्या कोणी भावी पंतप्रधान म्हणून ही फ्लेक्स लावेल, पण बहुमत मिळाल्याशिवाय काही होत नसतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 



हे झालं अजित दादांचं मत...पण जर समजा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलंच आणि जर मुख्यमंत्री बसवण्याचा मान राष्ट्रवादीला मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण योग्य वाटतं? अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात? याबाबतची चर्चा सध्या सुरु आहे.