Maharashtra NCP Political Crisis : 2024 मध्येही मोदींचं सरकार येणार, असे आमच्या वरिष्ठांनी सांगितले. मी खोटं नाही बोलणार... खोटं बोलून मला काय मिळवायचे आहे. तुम्ही खूप काही प्रेम दिले.. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो... माझं तर रेकॉर्ड झाले.  पण तिथेच गाडी थांबते, पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटते मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या म्हटले तर प्रमुखपद लागते, असे अजित पवार म्हणाले. 


महाराष्ट्र देशभरात सर्वच पातळीत पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे . मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता  आम्ही कुठेही कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी कामी आहोत का? असा सवाल उपस्थित करत अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत अजित व्यक्त केली. मला चार वेळा उपमुख्यमंत्री केले आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केले, मला पण मोठ्या पदाची अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.  


तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? 
गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहे.  आता 80 वर्षाचे झाले. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे.  आता तुमचे वय झाले आहेत. तुम्ही कधी थांबणार आहे की नाही? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे.  


मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले
अनेकदा मी माघार घेतली. मी टीका सहन केली. अनेकदा मी अपमान सहन केले. पण मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी मोठे गौप्यस्फोट केला. 2019 मध्ये भाजपसोबत पाच बैठका झाल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे. 


चिन्ह आणि पक्षही आपल्याकडे राहणार - अजित पवार 
चिन्ह आणि पक्षही आपल्याकडे राहायचाय, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही. राष्ट्रवादीच्या पक्षाला 25 वर्ष झाली आहेत, आपला पक्ष राज्याचा पक्ष झाला आहे. राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली. ती परत आपल्याला मिळवायची आहे. तुमच्या मदतीने केलेय, त्यामध्ये 2024 मध्ये ज्या निवडणुका होतील, त्यामध्ये राष्ट्रवादीचा आतापर्यंतचा 71 आमदारांचा आकडा पुढे घेऊन जाणारच, असा विश्वास अजित पवार यांनी या सभेत आपल्या कार्यकर्त्यांना दिला. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढूयात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अन् विदर्भ सर्व पिंजून काढूयात. पायाला भिंगरी बांदल्यासारखे फिरू.. माझी अजूनही दैवाताला (शरद पवार) विनंती आहे, विठ्ठलांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा, असे अजित पवार म्हणाले. 


तर मलाही उत्तर द्यावे लागेल, मीही सभा घेणार - अजित पवार 


मलाही थोडे बोलता येते, त्यामुळे शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला तर मलाही सात दिवसांनी दौरा करावा लागेल. सात दिवसांनी माझाही दौरा सुरु होईल. मी शांत बसलो, तर जनता म्हणेल माझ्यामध्ये खोट आहे, माझ्यामध्ये कोणताही खोट नाही, असे अजित पवार म्हणाले. शरदपवार दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात आणि छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे.  या सभेला उत्तर देणार आहे, मलाही थोडं बोलता येत, लोक माझेही ऐकतात, असा घणाघात अजित पावारांनी व्यक्त केला. 


अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर ?


दरम्यान, भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दोन दिवसांपूर्वी केला होता. भाजपकडून काँग्रेस पक्षही फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप चव्हाणांनी केला होता. आमच्या माहितीनुसार, सभापतींच्या निर्णयाच्या मदतीने (शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर) एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाईल आणि मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अशाच पद्धतीने भाष्य केले आहे. त्यामुळे राज्यात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची चर्चा रंगली आहे.