Maharashtra Political Crisisअजित पवार (Ajit Pawar) आणि समर्थक आमदारांनी पुन्हा एकदा शरद पवार  (Sharad Pawar) यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले. पण शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा वायबी चव्हाण सेंटर येथे गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी अजितदादा गटाकडे मांडल्याची माहिती मिळाली आहे.  अजित पवार आणि समर्थक आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर ते दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांनी कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. 


 शरद पवार यांच्या भेटीला कोणते नेते गेले ?


अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अतुल बेनके, अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्तामामा भरणे, संजय शिंदे, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, सरोज अहिरे, राजु कारेमोरे या नेत्यांनी शरद पवार यांची वायबी सेंटर येथे जाऊन भेट घेतली. 


अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात


उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवारांना साकडं घालणं सुरू झालंय. त्यामुळे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडलेत. अजित पवारांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते शंभर रुपयांच्या बॉण्डवर लिहून देतायेत. दुसरीकडे मात्र वेगळ्याच घडामोडी घडत असल्यानं कार्यकर्ते ही बुचकळ्यात पडलेत. पण पवार कुटुंब एकत्र आलं तर आमच्यावरही अशी वेळ येणार नाही, असं ते म्हणतायेत.  


त्यांच्या मनात काय सुरु काहीच माहित नाही - प्रफुल पटेल
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी सवाद साधला. शरद पवार यांच्याशी बातचीत झाली. राष्ट्रवादी एकत्रच ठेवण्याचा प्रस्ताव दिला. पण त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात काय सुरु आहे... हे माहित नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले. 


..तर शरद पवारांचे स्वागतच करु - दीपक केसरकर  


नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सगळेजण मानतात. नरेंद्र मोदी हे शरद पवारांना राजकीय गुरू मानतात, असं त्यांनी म्हटलं होतं. जर अजित पवार गट शरद पवारांचं मन वळवण्यात यशस्वी झाला तर आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. शरद पवारांचा अनुभव याची मदत आम्हाला सर्वांनाच होईल. आता शरद पवार आपला निर्णय बदलतील का? हे मी नाही सांगू शकत पण आमची पण अपेक्षा आहे की, त्यांनी जर बदलला तर त्याचे स्वागतच करू, असेही केसरकर म्हणाले. 


महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल असं वाटत नाही - विश्वजित कदम  


अजित पवार गट शरद पवारांची भेट घेतोय, यामध्ये वेगळं काही वाटायचं कारण नाही. शरद पवारांनी आपली भूमिका गट फुटल्यानंतर दोन ते तीन वेळेस स्पष्ट केली आहे. 
अजित पवारांचा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना ते भेटू शकतात त्यात आम्ही बोलणं योग्य नाही. यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल असं वाटत नाही, असे विश्वजित कदम म्हणाले.