Anna Bansode : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसलेल्या तगड्या झटक्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये बैठक बोलावली. 


मी वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला गेलो नाही


मात्र, या बैठकीला पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांचाही समावेश आहे. आण्णा बनसोडे कट्टर अजित पवार समर्थक मानले जातात. मात्र, त्यांनी बैठकीला दांडी मारल्याने राजकीय भूवया उंचावल्या. दरम्यान, आण्णा बनसोडे यांनी बैठकीला न जाण्यामागची भूमिका स्पष्ट केली. बनसोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, मी वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला गेलेलो नाही. यासंदर्भातील माहिती मी त्यांना दिली आहे. 


त्यांनी पुढे सांगितले की जेव्हा जेव्हा उठाव झाला तेव्हा मी अजित पवारांसोबत होतो आणि उद्याही अजित पवारांसोबत राहणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीचा परिणाम झाला आहे का? असे विचारण्यात आलं असता बनसोडे यांनी सांगितले की युतीचा उमेदवार 90 ते 92 हजार मतांनी निवडून आला आहे. त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. ग्रामीणमध्ये फरक पडला असला, तरी शहरी भागामध्ये फरक पडलेला नाही. मी आजही अजित पवारांसोबत असून उद्याही त्यांच्यासोबत असल्याचे आण्णा बनसोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. मात्र, अण्णा बनसोडे शरद पवार गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.


अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात? 


लोकसभा निवडणुकीत आघाडी महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 15 हून अधिक आमदार शरद पवार गटात परत येऊ शकतात, असा दावा केला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. असे झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारसाठी संकट वाढू शकते.10 महिन्यांपूर्वी अजित पवार काका शरद पवार यांना सोडून महायुतीत दाखल झाले. बारामतीतील दारूण पराभवानंतर अजित पवार कॅम्प बॅकफूटवर आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे, तर शरद पवार यांच्या नव्या पक्षाने नव्या चिन्हावर 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या आहेत.


40 आमदार अजित पवार यांच्यासोबत


दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 40 आमदार आहेत. शरद पवारांचे आमदार पुन्हा परतले तर निश्चितच राज्यात नवे राजकीय संकट उभे राहू शकते. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे 103 आमदार आहेत, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 40 आमदार आहेत. 288 सदस्यीय विधानसभेत आठ जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीचे आमदार त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी परतले तर शिवसेनेचे काही आमदारही हा मार्ग अवलंबू शकतात. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. दिल्लीत एनडीएच्या बैठकीला अजित पवार गेले नाहीत. त्यांच्या जागी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे गेले होते.


इतर महत्वाच्या बातम्या