मुंबई : पदवीधर (Graduates ) आणि शिक्षक ( Teachers) मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी आज दिवसभर सभा, मेळावे आणि गाटीभेटींवर भर दिला. या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (30 जानेवारी 2023) मतदान होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुदत होती.


Graduates And Teachers Constituencies Election : या मतदारसंघात निवडणूक 


राज्यातील पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. तर या पाच जागांवर सध्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील अशी लढत होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि काँग्रेसकडून धीरज लिंगाडे हे आमनेसामने आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे काळे विक्रम वसंतराव, भाजपकडून पाटील किरण नारायणराव हे दोघे महत्वाचे उमेदवार आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक भारतीचे धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.


भाजपची भूमिका गुलदस्त्यात


दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी मागणी केली तर पाठिंबा देऊ अशी भूमिका घेणाऱ्या भाजपने प्रचाराच्या शेवटपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेलवी आहे. परंतु, भाजप अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही तर भुमिपुत्राच्या पाठीशी उभं राहणार असं वक्तव्य भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केलंय.  जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगणार असल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे. 


मतदानाच्या दिवशी मद्यविक्री दुकाने बंद राहणार 


दरम्यान, पदवीधर मतदारसंघात मतदानाच्या दिवशीच मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत. पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश हायकोर्टाकडून रद्द आले असून मतदानाच्या दिवशी दुकाने बंद राहणार आहेत.


महत्वाच्या बातम्या


पदवीधर मतदारसंघात केवळ मतदानाच्या दिवशीच मद्यविक्री दुकाने बंद राहणार, पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश हायकोर्टाकडून रद्द