मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा (Gram Panchayat Elections) धुरळा उडाला असून सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. काही ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या असून रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. 


बीडमध्ये सर्व तयारी पूर्ण (Beed Gram Panchayat Election)


जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा आणि पोटनिवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने राबवला आहे. रविवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक विभागासह पोलीस यंत्रणेकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी 18 ग्रामपंचायतमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज भरलेले नाहीत. तर निवडणूकीपूर्वी जिल्ह्यात 3 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत.


बीड जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेला आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी 18 ग्रामपंचायतीसाठी एकाही सदस्यांचा अर्ज आलेला नाही तर 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच पोटनिवडणूका होत असलेल्या ठिकाणीही 3 ग्रा.पं.मधून एकही अर्ज निवडणूक विभागाकडे आलेला नसून पोटनिवडणुका होत असलेल्या 2 ग्रा. पं. बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात 13 ठिकाणी ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका होणार आहेत


धुळे जिल्ह्यामध्ये 26 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Dhule Gram Panchayat Election)


धुळे जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी पाच ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असून उर्वरित 26 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यात साक्री तालुक्यातील एक ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली असून शिरपूर तालुक्यातील दोन आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन ग्रामपंचायती या भाजपकडे गेल्या आहेत. यात साक्री तालुक्यातील डांगरशिरवाडे ही काँग्रेसकडे, शिरपूर तालुक्यातील बभलाज, गिधाडे या 2 भाजपकडे आणि शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे आणि पथारे ह्या भाजपकडे गेल्या असून  या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील तीनही तालुक्यांमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी ही लढत रंगली आहे.


यवतमाळमध्ये 31 ग्रामपंचायतीसाठी मतदान


यवतमाळ जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींची  सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे रविवारी 31 ग्रामपंचायतिसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सरपंच पदासाठी 76 उमेदवार तर सदस्य पदासाठी 365 उमेदवार रिंगणात उभे आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात 16 ग्रामपंचायती साठी उद्या मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायती शहादा तालुक्यातील आहेत.


ही बातमी वाचा: