Gram Panchayat Election 2022 Updates : राज्यभरातील जवळपास  7751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झालीय. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. यात धक्कादायक प्रकार म्हणजे बीडमधील एका ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटणावर फेविक्वीक टाकल्याची बाब समोर आलीय. तर काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटप करतानाचा कथित व्हिडीओ समोर आलाय.  


 Gram Panchayat Election 2022 : ईव्हीएम मशीनमध्ये टाकलं फेविक्विक


बीडमधील लिंबागणेश गावात सरपंच पदाचे उमेदवार असलेल्या गणेश वाणी यांच्या चिन्हा समोरील बटनावर अज्ञात व्यक्तीने फेविक्विक टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. गणेश वाणी हे लिंबागणेश गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत.  त्यांच्या नावासमोरील बटन दाबून देखील त्यांना मतं पडत नसल्याने ईव्हीएम मशीनची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकाराणानंतर एक तास मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यानंतर  तात्काळ उपविभागीय अधिकारी आणि पोलिस उपाधीक्षक यांनी या मतदान केंद्राला भेट दिली असून या प्रकरणी गणेश वाणी यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.  
 


Gram Panchayat Election 2022 : टोकवाडीत बोगस मतदानाचा आरोप


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील टोकवाडी येथे बोगस मतदान होत असल्याचा दावा करत उमेदवारांनी गोंधळ घातला. मतदार यादीमध्ये नाव नसतानाही व्यक्ती मतदान केंद्रामध्ये दाखल झाल्याने येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला गावकऱ्यांनी बाहेर काढलं. त्यानंतर टोकवाडीमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.  


Gram Panchayat Election 2022 : बुलढाण्यात बटन दबत नसल्याने गोंधळ 


बुलढाणा तालुक्यातील येळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इव्हीएम मशीनच्या बटणात बिघाड झाल्याने जवळपास अर्धा तास मतदान थांबविण्यात आलं होतं. याची माहिती तात्काळ तहसीलदारांना देण्यात आल्याने तातडीने इव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली. काही काळानंतर मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरू झालं.  
 


Gram Panchayat Election 2022 : सांगलीतील जत येथे कालपासून गोंधळ


जत तालुक्यातील वाळेखिंडी ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्ह पुसट दिसत असल्याने काल पासून गोंधळ सुरू होता. चिन्ह पुसट दिसत असल्याने नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याने तेथील मतदान प्रक्रिया काही काळासाठी ठप्प झाली होती.


Gram Panchayat Election 2022 : बूथ हलविल्याने गोंधळ



बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडे वस्ती येथील मतदान बूथ प्रत्येक वेळी मेंगडेवाडीच येथेच असते. मात्र यावेळी प्रशासनाने अचानक तेथील बूथ चऱ्हाटा येथे हलविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री उशिरा ग्रामस्थांनी बीड तहसीलसमोर ठाण मांडले होते. बीड तालुक्यातील मेंगडेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्र अचानक तेथील केंद्र चऱ्हाटा येथे हलविण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी बीड तहसील कार्यालयासमोर ठाण मांडले होते. मेंगडेवाडी येथेच बूथ ठेवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.  


Gram Panchayat Election 2022 : कोल्हापुरातील करवीर येथे मतदान यंत्रात बिघाड


करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड झाला होता. मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मतदान केंद्रांवर लांबच लांब मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.  


Gram Panchayat Election 2022 : माजलगावच्या नाखलगावमध्ये मतदान प्रक्रिया बंद


बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील वार्ड क्रमांक तीन मधील बॅलेट मशीन वरील सरपंच पदाच्या दोन उमेदवारांसमोरील चिन्हाचे बटन न दबल्याने उमेदवारांनी मतदान प्रक्रिया बंद पाडली होती.  


Gram Panchayat Election 2022 : भंडाऱ्यात मतदानादिवशीच प्रचार


 भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान सकाळी 7.30 वाजतापासून सुरू झाले आहे. गावस्तरावरील निवडणुकीत गटा तटाचे राजकारण बघायला मिळते. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भंडारा जवळील बेला गावातील निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. गावातील उत्साही मतदार मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना थांबवून सांगण्याचा प्रकार करीत होते. यावेळी भंडारा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे पोहचत सर्व थांबलेल्या मतदारांना, उमेदवारांना तिथून हुसकावून लावले. दरम्यान, मतदान केंद्र परिसरात वाहन रस्त्यावर लावल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असल्याने बेला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग दिसून आली.


Gram Panchayat Election 2022 : भंडाऱ्याच्या कुंभलीत निवडणुकीदरम्यान दोन गटात तुफान राडा


राज्यातील तब्बल साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळीच मतदानला सुरवात झाली आहे. तर या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुळ गाव असलेल्या सुकळीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली या गावात दोन गटामध्ये तुफान राडा झाला असल्याचे समोर आले आहे. कुंभली या गावात मतदान प्रक्रिया पार पडत असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. एका विशिष्ट गटाच्या उमेदवाराला मतदान केंद्र परीसराच्या आतमध्ये तर दुसऱ्या गटाच्या उमेदवाराला बाहेर ठेवल्यामुळे हा वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील कुंभली येथे ही घटना घडली.


 Gram Panchayat Election 2022 : वडवणीत सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल 



बीड जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबत आदेश दिले आहेत. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. ही बाब निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवींद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.


Gram Panchayat Election 2022 :  कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात सन्नाटा! ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार


कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंयतींसाठी मतदान सुरु असतानाच शाहूवाडी तालुक्यात मात्र, पूर्णत: सन्नाटा आहे. ग्रामस्थांनी शाहूवाडीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शाहूवाडीतील मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहूवाडी ग्रामस्थांचा विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानतंर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे चुरशीना मतदान होत असताना शाहूवाडी मात्र शुकशुकाट आहे.  
 


Gram Panchayat Election 2022 : मतदान केंद्र बदलल्याने मतदानाव बहिष्कार


बीडच्या जाधववाडी, मेंगडेवाडी, धुमळवाडी हे मतदान केंद्र गेल्या पंचवीस वर्षापासून मेंगडेवाडी येथे सुरू होते. परंतु, प्रशासनाने अचानक हे मतदान केंद्र हलवून चराटा या गावी नेले आहे. चराटापासून जाधवाडी मेंगडेवाडी याचे अंतर पाच किलोमीटर आहे. ही तिन्ही गावे डोंगरे विकास दुर्गम भागामध्ये मोडतात. हे मतदान केंद्र पूर्व मेंगडेवाडी या गावी देण्यात यावे ही गावकऱ्यांची मागणी केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी चक्क मतदाना दिवशी बहिष्कार टाकला आहे.