Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सकाळी 7.30 वाजता सुरु झालेली ही मतदान प्रक्रिया संध्याकाळी 5.30 वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. यातच तळकोकणातील एका नववधूने आपल्या विवाहाच्या मुहूर्तापेक्षा मतदानाच्या हक्काला प्राधान्य देऊन मतदानाबद्दल गंभीर नसलेल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. कणकवली तालुक्यातील लोरे गावातील गीता तेली या युवतीचे तिच्या गावापासून दूर 70 किमी वर लग्नमंडपात पोचण्याची धावपळ असतानाच नववधू होण्यासाठी चाललेल्या या युवतीने मतदानाला पहिले प्राधान्य दिले. वऱ्हाडी मंडळीसह ही नवरी थेट मतदान केंद्रावर पोचली. मतदान करून नंतरच ही युवती वऱ्हाडी मंडळीसह बोहल्यावर चढण्यासाठी रवाना झाली. धुळ्यातही फागणे येथे सीमा कुंभार यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे/ सीमा कुंभार यांचा आज विवाह सोहळा संपन्न होत आहे. मात्र तत्पूर्वी त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावत मतदानाला प्राधान्य दिले.


Beed Gram Panchayat Election 2022: बीडमध्ये 104 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क


बीड जिल्ह्याच्या धामणगावमध्ये 104 वर्षाच्या आजोबांनी स्वयंप्रेरणेने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. बीड जिल्ह्यातील सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या आणि यातच धामणगाव येथील 104 वर्षांच्या रघुनाथ चौधरी यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे.


Sangamner Gram Panchayat Election 2022: लग्नगाठ बांधण्या पूर्वी नवरदेव पोहचला मतदानकेंद्रावर


संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून साकुर ग्रामपंचायत निवडणुकीत केतन पेंडभाजे या नवरदेवने लग्ना अगोदर संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकार बजावलाय. साकुर येथील वीरभद्र मतदान केंद्रावर जात नवरदेवाने  मतदान केले असून लग्नाला येण्यापूर्वी मतदान करून या, असं आवाहन देखील केलं.


Kopargaon Gram Panchayat Election 2022: पिंक बूथ संकल्पना आता ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा 


कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतसाठी आज मतदान पार पडतंय. यातील दोन ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर तहसीलदार विजय बोरूडे यांनी अनोखी संकल्पना राबवत ग्रामपंचायत निवडणुकीत आगळा वेगळा प्रयोग केलाय. लोकसभा आणी विधानसभा निवडणुकी प्रमाणे पिंक बूथ संकल्पना आता ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा राबवली गेली आहे. कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायत निवडणुकीत महिलाराज बघायला मिळत असून तहसीलदारांनी पिंक बूथ ही प्रेरणादायी संकल्पना राबवलीय.


Kolhapur Gram Panchayat Election 2022: कोल्हापुरातही नवरदेवाने मतदानाला लावली हजेरी



कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावामध्ये नवरदेवाने मतदानाला हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. करमळी गावातील रहिवासी संतोष पाटील यांचा मतदान दिवशी विवाह होता. विवाह झाल्यानंतर लगेचच मतदान केंद्रामध्ये येत संतोष पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.