Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील जनतेनं अभूतपूर्व सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) अनुभवला आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात संत्तासंघर्ष उद्भवला. शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडापासून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळेपर्यंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ते संत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालापर्यंत महाराष्ट्रानं अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या. अशातच महाराष्ट्राच्या जनतेचा कौल काय? त्या कोणाची बाजू घेणार? त्यांचं या सत्तासंघर्षाबाबतचं मत काय? याबाबत अनेक दावे-प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांकडून केले जात आहेत. अशातच आता एक नवं सर्वेक्षण (Maharashtra Election Survey Results) समोर आलं आहे.
आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? या प्रश्नासह राज्यात एक ओपिनियन पोल घेण्यात आला आहे, या सर्वेक्षणात जनतेनं मांडलेली मतं खरंच धक्कादायक आहेत. दरम्यान, पुढच्या वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी हे सर्वेक्षण करून जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कोणाकडे किती जागा?
आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळताना दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला 165 ते 185 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 88 ते 118 जागांवर विजय मिळू शकतो. राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) दोन ते पाच जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 12 ते 22 जागा मिळताना दिसत आहेत. आता प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार ते पाहुयात...
कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजपला 121 ते 131 जागा मिळू शकतात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 44 ते 54 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेला आठ ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 41 ते 51 तर काँग्रेसला 39 ते 49 जागा मिळू शकतात. मनसेला दोन ते पाच जागा मिळू शकतात. इतरांना 12 ते 22 जागा मिळू शकतात. या ओपिनियन पोलनुसार, उद्धव ठाकरे गटाचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीनं बहुमताचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव गटानं तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे आकडे काहीही असले तरी, प्रत्येक्षात मात्र जनतेचा कौल कोणाला मिळणार? हे निवडणूक जाहीर झाल्यानंतरची परिस्थिती आणि त्यावेळची राजकीय समिकरणं यावरच ठेरल यात काही शंका नाही.
(या वृत्तातील आकडेवारी एका ओपिनियन पोलवरुन प्रकाशित करण्यात आलेली आहे. एबीपी न्यूज किंवा एबीपी माझा याबाबत कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :