मुंबई : बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे, मुंबादेवीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंह राजकारणातील दिग्गजांच्या सभांसह प्रचाराच्या तोफा थंडावल्याचं दिसून आलं. कुठे सभा घेण्यात आल्या. तर कुठे बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या. अनेक नेत्यांनी आपल्या होमग्राऊंडवर सभा गाजवल्या. सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराचा शेवट झाला असून आता बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीनेही जोरदार दणक्यात प्रचार केला. आता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे.
मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीत शेवटची सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्यासाठी शेवटची सभा घेतली. शायना एनसी या मूळच्या भाजपच्या असून मुंबादेवी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी सांगता सभा घेतली.
वांद्रेमध्ये उद्धव ठाकरेंची सभा
वांद्रे पूर्वचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सांगता सभा घेतली. वरुण सरदेसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांचं आव्हान आहे.
बारामतीत पवार काका-पुतण्याची सभा
परंपरेप्रमाणे शरद पवार यांनी त्यांची शेवटची सभा बारामतीमध्ये घेतली. त्यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी सांगता सभा घेतली. तर दुसरीकडे अजित पवारांनीही त्यांची सांगता सभा बारामतीमध्ये घेतल्याचं दिसून आलं. बारामतीमध्ये यंदा काका-पुतण्यामध्ये लढत असून अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा :
- देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तर बारामती म्हटलं की कुणाचं नाव घेतात? आता हीच परंपरा युगेंद्र पवार पुढे नेतील : शरद पवार
- Baramati : जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय... बारामतीच्या शेवटच्या सभेत प्रतिभा पवारांनी झळकावला बॅनर