Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान संपल्यानंतर आता 23 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार असाही प्रश्न सर्वांच्या मनात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) या दोन्ही आघाड्यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे जाहीर केले होते.


कोणत्या नेत्यांना पसंती?


पीपल्स पल्सच्या PEOPLES PULSE एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, 35.8 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची पहिली पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. त्यांना 21.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना 11.7 टक्के, तर अजित पवार यांना 2.3 टक्के आणि नाना पटोले यांना 1.3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. इतरांना 27.2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.


एकनाथ शिंदे


एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2009मध्ये एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून विजयी झाले होते, त्यानंतर ते येथून कधीही हरले नाहीत. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशाने महाराष्ट्र निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची महायुतीला आशा आहे.


देवेंद्र फडणवीस


भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी सलग चौथ्यांदा या जागेवरून निवडणूक लढवली. 2009 पासून ते येथील आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत.एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हा फडणवीस यांच्याकडे भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती.


अजित पवार


अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. ते सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अजित पवार पुन्हा पुण्याच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत. गेल्या सात निवडणुका ते येथून जिंकत आले आहेत. यावेळी अजित पवारांना त्यांचे पुतणे आणि  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याशी चूरशीचा सामना आहे. या जागेवर शरद पवार यांनीही निवडणूक जिंकली आहे. अजित पवारांनी काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली, त्यानंतर ते समर्थक आमदार खासदारांसह महायुतीत दाखल झाले होते.


उद्धव ठाकरे


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेचे (UBT) नेतृत्व करत आहेत. उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवत नाहीत. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (UBT) महाविकास आघाडीसोबत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने नऊ जागा जिंकल्या होत्या.


राज्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar), उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि काँग्रेस हे विरोधी महाविकास आघाडी (MVA) या आघाडीचा भाग आहेत. तर, भाजप व्यतिरिक्त सत्ताधारी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. आता राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार आणि कोण मुख्मंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.