लातूर/सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत दाखल झाल्यात आहेत. हा विक्रम केला आहे लातूरच्या देशमुख बंधूंनी आणि सोलापूरच्या शिंदे बंधूंनी. विलासराव देशमुख यांचा वारसा सांगणारे त्यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी यावेळी नशीब आजमावले आणि विजय मिळवला. तर सोलापुरात बबन शिंदे आणि संजय शिंदे बंधूंनीही विजयश्री मिळवला.
अमित देशमुख यांची हॅटट्रिक
अमित देशमुख यांनी हॅटट्रिक साधत तब्ब्ल 40 हजार मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. त्यांनी भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा पराभव केला. शैलेश लाहोटी यांना 68497 मतं पडलं.
धीरज पहिल्यांदाच विधानसभेत
तर धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लातूर ग्रामीणची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि लढत सोपी झाली. जवळपास एक लाखांच्या विक्रमी मतांची लीड घेत धीरज देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन जागा आल्या आहेत, त्या दोन्ही जागा देशमुख बंधूंच्या रुपात आल्या आहेत हे विशेष.
सोलापुरातही भावांची जोडी विधानसभेत
बबन शिंदे सलग सहावेळा माढ्याचे आमदार
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा सुमारे 68 हजार मतांनी पराभव केला. विधानसभेवर निवडून जाण्याची बबन शिंदे यांची ही सलग सहावी वेळ आहे. याविधानसभा निवडणुकीपूर्वी बबन शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीने माढा मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी दिली आणि त्यांचा विजयही झाला.
संजय शिंदेंचा विजय
संजय शिंदे यांनी यंदा अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवत पहिल्यांदाच विधानसभेत गेले आहेत. संजय शिंदे हे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. सोलापुरातील करमाळा मतदारसंघात अपक्षांचा बोलबाला राहिला. नारायण पाटील या अपक्ष उमेदवाराने संजय शिंदेंना कडवी झुंज दिली. परंतु संजय शिंदे यांनी जवळपास साडेपाच हजार मतांनी विजय मिळवला. त्याआधी माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु तिथे त्यांचा पराभव झाला.