सातारा : महायुतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळवलं. महायुतीला मित्रपक्षांसह 236 जागांवर विजय मिळाला. महायुतीला राज्यातील सर्व भागातून प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, माण, फलटण या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सातारा जिल्ह्यातून भाजपचे चार आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेनं दोन जागांवर विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या. महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात साताऱ्यातून भाजपमधून शिवेंद्रराजे भोसले नाव निश्चित झालं आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे देखील मंत्री होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील यांचं नाव निश्चित झालं आहे.
साताऱ्याला मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्रिपदं
सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या तीन घटकपक्षांकडून प्रत्येकी एका आमदाराला याप्रमाणं संधी दिली जाण्याची शक्यता होती ती खरी ठरली आहे. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीच्या आमदारांसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली होती. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद देण्यात यावं अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याशिवाय शिवेंद्रराजे भोसले राज्यातून दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. त्यामुळं त्यांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर होतं, भाजपनं त्यांना मंत्रिपदासाठी फोन केला आहे. जयकुमार गोरे यांचं नाव देखील निश्चित झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. जयकुमार गोरे माण विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपच्या चिन्हावर ते विजयी झाले आहेत.
शंभूराज देसाईंना पुन्हा मंत्रिपद
पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हॅटट्रिक करत विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी होती. ते उत्पादन शुल्क मंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
मकरंद पाटील देखील शपथ घेणार
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून देखील साताऱ्यात एक मंत्रिपद दिलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा मकरंद पाटील यांना देखील मंत्रिपद मिळणार होतं. मात्र, त्यावेळी ते शक्य झालं नव्हतं. यावेळी राष्ट्रवादीतून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्यानं मकरंद पाटील यांना संधी मिळाली आहे.
इतर बातम्या :