बीड : राज्यभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या वेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची तर काही ठिकाणी दोन गटात राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गटात बोगस मतदारांवरुन जुंपली.


पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप आहे. हे 10 ते 15 मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचं कळतं. ओळखपत्रावरील फोटो आणि मतदार यांचे फोटो जुळत नसल्याने हा प्रकार समोर आला. हा प्रकार घडला त्यावेळी संदीप क्षीरसागर उपस्थित होते. या हे कर्मचारी खरंच जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

काका-पुतण्या समोरासमोर, राहायला मात्र एकच बंगला
बीड मतदारसंघात काका-पुतण्या अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांचं आव्हान आहे. निवडणुकीच्या मैदानात हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी त्यांचं वास्तव्य एकाच घरात आहे. बीडमधील नगर रोडवर त्यांचा बंगला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्त असो किंवा शिवसेनेचा त्याला कामासाठी आपल्या नेत्याला भेटायचं असेल तर या बंगल्यावरच यावं लागतं.

क्षीरसागर कुटुंबामध्ये उभी फूट
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन क्षीरसागर कुटुंबांमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून फारकत घेतली. त्याचवेळी संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून बळ मिळालं आणि जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मागच्या दोन अडीच वर्षापासून संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले चांगलेच बस्तान बसवले अगदी बीड नगरपालिकेमध्ये दोन्ही काकांना धोबीपछाड देत संदीप क्षीरसागर यांनी सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा काकाच्या राजकारणाला धक्का देत विजय संपादन केला आता पुन्हा हे काका-पुतणे आमने-सामने उभे आहेत.