अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे ही घटना आहे. भालेराव वणवे आणि हर्षवर्धन कुंदे हे भाजपचे कार्यकर्ते मतदानाला जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांवर चाकूने हल्ला केला. भाजपच्या एक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि दुसऱ्याच्या हातावर वार केल्याने भाजपचे दोन्ही कार्यकर्ते जखमी झाले.


दरम्यान जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना जमखेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या हल्ल्यामुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कशामुळे केला याची चौकशी पोलीस करत आहेत. मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला या घटनेमुळे गालबोट लागले आहे.

 बोगस मतदारांवरुन बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर गटात राडा

राज्यभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या वेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची तर काही ठिकाणी दोन गटात राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गटात बोगस मतदारांवरुन जुंपली. पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप आहे. हे 10 ते 15 मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचं कळतं. ओळखपत्रावरील फोटो आणि मतदार यांचे फोटो जुळत नसल्याने हा प्रकार समोर आला. हा प्रकार घडला त्यावेळी संदीप क्षीरसागर उपस्थित होते. या हे कर्मचारी खरंच जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जीवघेणा हल्ला
अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. भुयार यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात देवेंद्र भुयार थोडक्याच बचावले. हल्ल्यामध्ये त्यांची गाडी जळून खाक झाली आहे. मोर्शीमध्ये भुयार यांच्या विरुद्घ भाजपचे अनिल बोंडे यांच्यात लढत होतेय.

जालन्यातील अंबडच्या जामखेडमध्ये दोन गटात धक्काबुक्की
जालन्यातील अंबडच्या जामखेडमध्ये दोन गटात धक्काबुक्की झाली. भाजपचे सरपंच आणि राष्ट्रवादीच्या उपसरपंचाच्या गटात मारहाण झाली. औरंगाबादच्या मंजूरपुरा भागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची पाहायला मिळाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.