मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असे म्हणत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या जोरदार पलटवार केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागली आहे.
संजय राऊत म्हणाले की, या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहे. नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन शहरात पवार हे आपले कसे राजकीय गुरू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे? हे वारंवार सांगितला आहे. पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं आहे. भाजप सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असे हे म्हणत आहेत. त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहावा आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं, याचं देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आत्मचिंतन करावं, असा हल्लबोल त्यांनी केला.
महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम
पवार साहेब या देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर असं व्यक्त करून महाराष्ट्राचे मान शर्मेने खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. महाराष्ट्राला महान राजकारणाची परंपरा आहे. तुळशीच्या वृंदावनात भांगीची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहेत. महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती
सदाभाऊ खोत यांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? टीका करायला लोकशाहीत काही हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवले आहे. म्हणून आम्हाला या राज्यातील सत्ता बदलायची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लबोल संजय राऊत यांनी केलाय.
आणखी वाचा